Home Breaking News घुग्घूस महावितरण कार्यालय शहराबाहेर हलविण्याच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध

घुग्घूस महावितरण कार्यालय शहराबाहेर हलविण्याच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध

18
Oplus_131072

घुग्घूस महावितरण कार्यालय शहराबाहेर हलविण्याच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध

सुवर्ण भारत : पंकज रामटेके सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर 

घुग्घूस : शहरातील महावितरण (एमएसईबी) कार्यालय मातारदेवी येथे स्थलांतरित करण्याच्या हालचालींना घुग्घूस शहर काँग्रेस कमिटीने तीव्र विरोध दर्शविला असून, कार्यालय शहरातच कायम ठेवण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. महावितरण कार्यालय शहराबाहेर गेल्यास नागरिकांना दैनंदिन कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, असा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

मातारदेवी हे ठिकाण घुग्घूस शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असल्याने अमराई, तिलकनगर, शांतिनगरसह शहरातील विविध भागांतील नागरिकांना वीजबिल, नवीन जोडणी, तक्रारी व अन्य कामांसाठी वारंवार प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक, शारीरिक व मानसिक ताण पडेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर घुग्घूस शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नगराध्यक्षा दिप्ती सोनटक्के, काँग्रेस शहराध्यक्ष तथा नगरपरिषद उपाध्यक्ष राजू रेड्डी, स्वच्छता व आरोग्य सभापती नुरूल सिद्दीकी, काँग्रेस नेते सय्यद अनवर, नगरसेवक पंकज धोटे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार व दीपक पेंदोर यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अनिरुद्ध पेंदोर यांची भेट घेत निवेदन सादर केले.

महावितरण कार्यालय शहराबाहेर हलविण्याचा निर्णय तात्काळ रद्द करून कार्यालय नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणीच ठेवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच प्रशासनाने नागरिकांच्या भावना व अडचणींची दखल घेत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा महावितरणविरोधात तीव्र असहकार आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.