बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील आरपीएफ जवानांची तत्परतेने प्रवासी बचावला
सुवर्ण भारत: वैभव मेश्राम
बल्लारपूर, प्रतिनिधी
बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावर सोमवारी १८ मे रोजी घडलेल्या प्रसंगात रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांच्या प्रसंगावधानामुळे एका प्रवाशाचा जीव वाचला. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून सुटलेल्या १२६२२ तमिळनाडू एक्सप्रेसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एक प्रवासी तोल जाऊन रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील जागेत अडकून काही अंतर फरफटत गेला. मात्र आरपीएफ जवानांनी वेळीच धाव घेत त्याला सुरक्षित बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवासी नवी दिल्लीहून चेन्नईकडे तमिळनाडू एक्सप्रेसने प्रवास करीत होता.

गाडी सुटत असताना तो डब्यात चढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा तोल गेला आणि तो रेल्वेच्या दरवाजाजवळून खाली घसरला. हा प्रकार लक्षात येताच आरपीएफ बल्लारशाहचे आरक्षक पवन कुमार यादव यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेत प्रवाशाला पकडून प्लॅटफॉर्मकडे ओढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.




