शेतीच्या धुऱ्यावरून वाद; वृद्ध शेतमजुराला मारहाण, शिवीगाळ
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर (वरोरा तालुका प्रतिनिधी)
शेगाव : वरोरा तालुक्यातील चारगाव बु. येथे
शेतीच्या धुऱ्याच्या वादातून ७० वर्षीय वृद्ध शेतमजुराला मारहाण व शिवीगाळ झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शेगाव बु. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदार सुभाष गोसाई शेडामे (वय ७०, रा. चारगाव बु.) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या शेतालगत विठ्ठोबा बावने यांचे शेत असून त्यांचा मुलगा प्रदीप बावने शेती करतो. काही दिवसांपासून शेतीच्या धुऱ्यालगत माती टाकून पोल गाडण्याचे काम सुरू होते. यातील एक पोल तुटल्याने तो आपल्या हद्दीत व्यवस्थित गाडावा, असे शेडामे यांनी वारंवार सांगितले होते.
दि. २४ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सुभाष शेडामे शेत पाहणीस गेले असता प्रदीप बावने तुटलेला पोल गाडत होता. यावेळी पोल आपल्या हद्दीत गाडावा, असे सांगितल्यावर दोघांत वाद झाला. तक्रारीनुसार, प्रदीप बावने यांनी अश्लील शिवीगाळ करून सुभाष शेडामे यांच्या गालावर थप्पड मारली तसेच ढकलाढकली व मारहाण केली.
तसेच शेतात काम करणारा मजूर जितेंद्र बोथले यानेही शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या स्वप्नील तुराणकर यांनी मध्यस्थी करून वाद सोडविला. तक्रारदाराचा मुलगा प्रफुल शेडामे मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्यालाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी शेगाव बु. पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


