नेहरू चौकातील वाईन शॉपसमोर वृद्ध शेतकऱ्याचे ९,२०० रुपये लंपास; युवकाविरुद्ध चोरीचा गुन्हा

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर ( वरोरा तालुका प्रतिनिधी)
वरोरा : नेहरू चौकातील निर्वाण वाईन शॉपसमोर गर्दीचा फायदा घेत एका युवकाने वृद्ध शेतकऱ्याच्या पॅन्टच्या खिशातून ९ हजार २०० रुपये चोरून नेल्याची घटना २४ मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वामन तुळशीराम धाबेकर (वय ६८, रा. स्नेहांकीत नगर, शिवाजी वार्ड, माढेळी नाका, वरोरा) हे शेती व्यवसाय करतात. त्यांची चरुरखटी येथे शेती असून ते ठेक्यानेही शेती करतात.
दि. २४ मे रोजी शेतीच्या कामासाठी डिझेल घेण्याकरिता ते घरून ९,२०० रुपये घेऊन निघाले होते. रात्री सुमारे ७.५० वाजता नेहरू चौकातील निर्वाण वाईन शॉप येथे सुभाष निर्वाण यांना भेटण्यासाठी गेले असता दुकानासमोर मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून ९,२०० रुपये काढून पळ काढला.
खिशातून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र पैसे मिळून आले नाहीत. त्यानंतर वाईन शॉपमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक युवक त्यांच्या मागून येऊन खिशातून पैसे काढताना दिसला. दुकानातील कर्मचारी प्रतीक कनोजे याने संबंधित युवकाची ओळख मंगेश उर्फ डोमा येळणे (वय २०, रा. चिरघर प्लॉट, वरोरा) अशी पटवून दिली.
या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी आरोपी मंगेश उर्फ डोमा येळणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


