
वेणा नदीतून रेतीची अवैध वाहतूक
दोन ट्रॅक्टरसह १७.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर ( वरोरा तालुका प्रतिनिधी)
वरोरा : वरोरा पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत वेणा नदी पात्रातून अवैधरित्या रेतीची चोरी व वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर धाड टाकून तब्बल १७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सपोनी शरद एस. भस्मे हे पोलीस स्टाफसह गस्त घालत असताना २४ मे २०२६ रोजी रात्री नागरी गावाजवळ गुप्त माहिती मिळाली की, काही इसम लाल रंगाच्या ट्रॅक्टरद्वारे वेणा नदी पात्रातून विनापरवाना रेतीची चोरी करून नागरीकडे वाहतूक करीत आहेत.
यानंतर पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह नागरी गावातील बालाजी मंदिर परिसरात नाकाबंदी केली. दिनांक २५ मे रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास केळी गावाकडून दोन संशयित ट्रॅक्टर येताना दिसले. पोलिसांनी दोन्ही वाहने थांबवून तपासणी केली असता ट्रॉलीमध्ये रेती आढळून आली.
पहिल्या ट्रॅक्टरमधून १ ब्रास रेती जप्त
ट्रॅक्टर क्रमांक एमएच 34 सीआर 4920 हा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर असून चालकाने आपले नाव सचिन प्रभाकर मुसळे (वय ३६, रा. उखर्डा ता. वरोरा) असे सांगितले. ट्रॉली क्रमांक एमएच 34 सीक्यू 1719 मध्ये अंदाजे १ ब्रास रेती आढळून आली. रेतीबाबत रॉयल्टी अथवा कोणतेही वैध कागदपत्र चालकाकडे नव्हते. सदर रेती ही मालक वासुदेव पुरुषोत्तम डोमकावळे (रा. उखरडा ता. वरोरा) यांच्या सांगण्यावरून वेणा नदीतून भरल्याचे निष्पन्न झाले.
दुसऱ्या ट्रॅक्टरमध्येही अवैध रेती
तसेच ट्रॅक्टर क्रमांक एमएच 32 पी 2350 हा महिंद्रा 575 कंपनीचा ट्रॅक्टर असून चालक सौरभ प्रभाकर सोयाम (वय २५, रा. केळी ता. वरोरा) याच्याकडे वाहन आढळले. ट्रॉली क्रमांक एमएच 32 पी 2283 मध्येही अंदाजे १ ब्रास रेती आढळून आली. याबाबत कोणतीही रॉयल्टी अथवा कागदपत्र नसल्याचे चालकाने सांगितले. सदर रेती मालक दिलीप महल्ले (रा. केळी ता. वरोरा) यांच्या सांगण्यावरून नदी पात्रातून आणल्याचे समोर आले.
१७.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी दोन ट्रॅक्टर, ट्रॉली व अंदाजे २ ब्रास रेती असा एकूण १७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध कलम 303(2) भारतीय न्याय संहिता (BNS) – चोरी व अवैध मालवाहतूक संदर्भातील गुन्हा कलम 48 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम – विनापरवाना गौण खनिज उत्खनन व वाहतूक
सदर कारवाई वरोरा पोलिसांनी पंचासमक्ष केली असून पुढील तपास सुरू आहे.




