• आप’सहज सुचलं’ महिला ग्रुपतर्फे चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांचे स्वागत
• विविध सामाजिक विषयांवर साधला महिलांनी सकारात्मक संवाद!
चंद्रपूर : किरण घाटे

कला, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा आणि संगीत अश्या विविध क्षेत्रांतील नवोदितांना नेहमीच कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रगतीच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा महाराष्ट्रातील अग्रगण्य ‘सहज सुचलं’ महिला व्हॉट्सॲप ग्रुपने परत एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
याच समूहाच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका, नागपूर येथील प्रख्यात समाजसेविका व योग शिक्षिका मायाताई कोसरे यांच्या सूचनेच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांचे समूहाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन नुकतेच थाटात स्वागत करण्यात आले.
सदिच्छा भेटी दरम्यान उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी नूतन पोलिस अधीक्षक नोपानी यांच्याशी जिल्हाभरातील विविध सामाजिक प्रश्न, कायदा,सुव्यवस्था तद्वतच महिला सुरक्षा व सबलीकरण यांविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांनी चर्चा केली.
काही वेळ सकारात्मक सुसंवाद साधला. नूतन पोलिस अधीक्षकांनीही समूहाच्या सामाजिक व वाङ्मयीन कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
भेटी दरम्यान मुल नगर परिषदेच्या विद्यमान महिला व बांधकाम सभापती नलिनी आडपवार , कोसंबीच्या समाजसेविका चंदा कामडी , विदर्भातील सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार, राजूराच्या जेष्ठ व नामवंत साहित्यिक मेघा धोटे ,चंद्रपूरच्या समाजसेविका व योग शिक्षिका रंज्जू मोडक , चंद्रपूर सहज सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका विद्या पिंजरकर , विदर्भाच्या लोकप्रिय नाट्यकलावंत टीना उराडे महाराष्ट्रातील लोककलावंतच्या अध्यक्ष सारिका उराडे यांच्यासह सहज सुचलं मित्र परिवारातील व समूहातील इत्तर अन्य मान्यवर सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.



