चामोर्शीच्या कन्येचा मुंबईत सन्मान
चंद्रपूर -किरण घाटे
नुकत्याच नवी मुंबई सानपाडा येथे पार पडलेल्या पारिजात समुहाच्या साहित्य संमेलनात प्रा . सुनंदा पाटील यांचा भव्य सत्कार केला गेला . सुनंदा पाटील ह्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील बाळासाहेब दीक्षित यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत.
याप्रसंगी त्यांच्या हस्ते उर्मिला बांदिवडेकर यांच्या गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले . तसेच ” एका ज्येष्ठ लेखिकेचा साहित्य प्रवास ” या विषयावर त्यांची दीर्घ मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत पुण्याच्या कवयित्री नंदिनी काळे यांनी घेतली. समुह प्रशासक शबाना मुल्ला यांनी त्यांचा सन्मान केला .
याच महिन्यात त्यांना अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत . अंतर्गान तर्फे त्यांची ” गझलांकित कवी – सुरेश भट ” यांच्या आठवणींवर आधारीत मुलाखत स्वर्णस्वर बोरीवली मुंबई येथे पार पडली . दि . ३ मे ला तळेगाव येथे गझलसन्मान आणि ४ मे ला शब्दवेल चा साहित्यिक सन्मान पुणे येथे मिळाला . ८ मे २०२६ रोजी मुंबईला सर्वद संस्थेचा प्रतिष्ठेचा ” स्टार लेखिका पुरस्कार ” अभिनेते अरुण नलावडे यांच्या उपस्थितीत प्राप्त झाला . तसेच यावर मानाचा शिरपेच म्हणजे परिजात संस्थेतर्फे झालेला सन्मान !
एका खेड्यातून निघून महानगरात आपले पाय रोवणे, आपला ठसा उमटवणे सोपे नसते . परंतु सुवर्णपदक विजेत्या – स्कॉलर आणि उच्चशिक्षित अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या सुनंदा या चामोर्शीच्या शान आहेत . स्वतः च्या भरवशावर ,कोणतेही – कुणाचेही पाठबळ नसताना त्यांनी मिळविलेले हे यश अतिशय मोठे आहे . लेखिका – कवयित्री – गझलकार – वक्ता म्हणून त्यांचे स्थान मोठे आहे. सर्व स्तरांतून त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.



