वाहन जाळपोळ प्रकरणातील आरोपी रोशन राणे यांना सशर्त जामीन
सुवर्ण भारत : शंकर महाकाली (संपादक)
चिमूर : चिमूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन जाळपोळ प्रकरणातील आरोपी रोशन नथुजी राणे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने प्रकरणातील परिस्थिती, तपासाची प्रगती आणि आरोपीची पार्श्वभूमी विचारात घेत हा आदेश दिला.
प्राप्त माहितीनुसार, सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 326(f), 326(g) व 324(5) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने न्यायालयासमोर युक्तिवाद करताना फिर्यादी व आरोपी यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याचे नमूद केले. तसेच आरोपीला चुकीच्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
प्रकरणाचा विचार करताना न्यायालयाने नमूद केले की, या गुन्ह्यातील महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब आधीच नोंदविण्यात आले असून तपासही अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. याशिवाय आरोपीविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याची बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आली.
या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून न्यायालयाने आरोपी रोशन राणे यांना एका सक्षम जामीनदाराच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. मृणालिनी सी. रागीट यांनी प्रभावी बाजू मांडत जामिनासाठी युक्तिवाद केला.
- विशेष :न्यायालयीन सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने मांडलेल्या मुद्द्यांचा आणि तपासाच्या सद्यस्थितीचा विचार करून न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.







