सहारा पार्कमध्ये भरदिवसा घरफोडी; ३ लाखांचे सोन्याचे दागिने गायब.
वरोऱ्यात भरदिवसा घरफोडी; ३ लाखांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास
वरोरा, दि. 21 सप्टेंबर २०२६ : वरोरा शहरातील सहारा पार्क परिसरात अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे ३ लाख रुपये किमतीचे ५६ ग्रॅम सोन्याचे दागिने व २ हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ अनिल कटाईत (वय ३०, रा. प्लॉट नं. ३८, सहारा पार्क, वरोरा) हे समुद्रपूर येथील जिल्हा परिषद आरोग्य विभागात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आई-वडिलांसह ते वरोरा येथे राहतात.
दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास सौरभ कटाईत यांनी घराच्या दरवाजाला तसेच कंपाउंडच्या लोखंडी गेटला कुलूप लावून ते समुद्रपूर येथे कर्तव्यावर गेले होते . दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास ते घरी परतले असता घराच्या दरवाज्याचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले.
घरात प्रवेश करून पाहणी केली असता बेडरूममधील प्लायवुडचे कपाट उघडे असून कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. कपाटात ठेवलेले आई-वडिलांचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या ऐवजात १५ ग्रॅम सोन्याचा गोफ, १७ ग्रॅम सोन्याची ठुसी, ६ ग्रॅम सोन्याचे झुमके, ३ ग्रॅमची सोन्याची बदामी अंगठी, ५ ग्रॅमची सोन्याची बदामी अंगठी आणि १० ग्रॅमची गहू मन्याची सोन्याची पोत, असा एकूण ५६ ग्रॅम सोन्याचा ऐवज, अंदाजे किंमत ३ लाख रुपये, तसेच २ हजार रुपये रोख असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे घरातील लॅपटॉप व टॅब मात्र सुरक्षित असल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेची माहिती कटाईत यांनी आई-वडिलांना तसेच पोलिसांना दिली.
दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.३० ते दुपारी १.१५ वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घराचे कुलूप तोडून प्रवेश केला व कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.







