Home Breaking News मुक्या जिवांचा आधार बनले लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन ; १३ गावात ३४२२ पशूंच्या...

मुक्या जिवांचा आधार बनले लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन ; १३ गावात ३४२२ पशूंच्या जीवनाला दिला नवा आधार • ग्रामीण पशुधनाच्या आरोग्य संवर्धनासाठी लॉयड्सचा हृदयस्पर्शी पुढाकार – पशुपालकांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू

3

मुक्या जिवांचा आधार बनले लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन ; १३ गावात ३४२२ पशूंच्या जीवनाला दिला नवा आधार

ग्रामीण पशुधनाच्या आरोग्य संवर्धनासाठी लॉयड्सचा हृदयस्पर्शी पुढाकार – पशुपालकांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू

*घुग्घुस / चंद्रपूर :* शेतकऱ्याच्या सुख-दुःखाचा खरा सोबती म्हणजे त्याचे पशुधन. याच मुक्या जिवांच्या वेदना जाणून, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनने माणुसकीचा हात पुढे केला आहे. फाउंडेशनतर्फे ऑगस्ट ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत घुग्घुस परिसरातील १३ गावांमध्ये भव्य पशु आरोग्य तपासणी व लसीकरण मोहीम राबविण्यात आली, या मोहिमेला पशुपालकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.

या मोहिमेचा प्रमुख उद्देश केवळ लसीकरण नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पशुधनाला संसर्गजन्य रोगांपासून वाचवणे, त्यांची उत्पादकता वाढवणे आणि पशुपालक शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य देणे हा होता.

*१३ गावांमध्ये आरोग्याचा जागर*

या मोहिमेअंतर्गत वढा, पांढरकवडा, उसगाव, म्हातारदेवी, बेलसणी, मुरसा, शेणगाव, पिपरी, महाकुर्ला, घुग्घुस, धानोरा, साखरवही आणि अंतुर्ला या १३ गावांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये तब्बल *३,४२२ पशूंची* आरोग्य तपासणी करण्यात आली, तर *२,५०५ पशूंना* जीवघेण्या रोगांपासून वाचवण्यासाठी लसीकरण करण्यात आले. यामध्ये ५४३ गायी, ८०१ बैल, २६८ म्हशी आणि १,८१० शेळ्यांचा समावेश आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या सहायक महाप्रबंधक डॉ. विद्या पाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व शेकडो पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन*

शिबिरांमध्ये घुग्घुस, पांढरकवडा, मुरसा आणि नागाळा येथील शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बागडे, डॉ. भागवत, डॉ. तिनखेडे, डॉ. बुरांडे आणि डॉ. मस्के यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांनी प्रत्येक जनावराची बारकाईने तपासणी करून आवश्यक उपचार केले. तसेच पशुपालकांना योग्य पोषण, नियमित आरोग्य तपासणी, स्वच्छता आणि रोगप्रतिबंधक उपायांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या मोहिमेत विशेषतः शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या FMD (तोंड व पाय खुरकूत) आणि LSD (लम्पी स्किन डिसीज) या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षणासाठी लसीकरण करण्यात आले. यासोबतच गायी व शेळ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी मल्टिव्हिटामिन, फॉस्फरस पूरक, PPR, Tribuvet आणि ETV सारखे प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले.

पशुधनाचे आरोग्य आणि दूध उत्पादन वाढावे यासाठी शिबिरांमध्ये *६३९ मिनरल मिक्स्चर पॅक, ७०२ मिनरल वीटा आणि ५५२ जखमेवरील स्प्रे* बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

*पशुपालकांमध्ये समाधानाचे वातावरण*

वेळेवर उपचार, मोफत लसीकरण आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्याने पशुपालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. “जनावर जगलं तर घर जगतं” ही भावना यावेळी प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत होती.

यावेळी बोलताना लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या सहायक महाप्रबंधक डॉ. विद्या पाल म्हणाल्या, *“ग्रामीण विकासामध्ये पशुधनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पशुधन निरोगी राहिले तरच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते. त्यामुळे केवळ उद्योग नव्हे तर शेतकरी सक्षमीकरण हेच आमचे ध्येय आहे. पशुपालकांच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यातही असे उपक्रम सातत्याने सुरू ठेवले जातील.”*

या मोहिमेच्या यशस्वितेसाठी शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापक डॉ. आदित्य कदम, डॉ.महेंद्र वैरागडे,श्री.महेश उपरे, श्री.मानस मकासरे,श्री. गजानन बोबडे, श्री. आदित्य मोहितकर, श्री. अभिजित चौधरी, श्री. धनंजय पिंपळशेंडे,श्री.नीरज काळे तसेच सर्व गावातील ORW टीमने अथक परिश्रम घेतले. गावपातळीवर केलेल्या प्रभावी जनजागृतीमुळे ही मोहीम १००% यशस्वी ठरली.

निश्चितच, लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनचा हा उपक्रम ग्रामीण भागातील मुक्या जिवांना संजीवनी देणारा आणि बळीराजाच्या आर्थिक स्थैर्याला बळ देणारा ठरला आहे.