Home Breaking News नझुल पट्ट्यांपासून विमानतळ विस्तारापर्यंत प्रश्नांचा पाठपुरावा; आमदार जोरगेवारांची अपर मुख्य सचिवांशी चर्चा

नझुल पट्ट्यांपासून विमानतळ विस्तारापर्यंत प्रश्नांचा पाठपुरावा; आमदार जोरगेवारांची अपर मुख्य सचिवांशी चर्चा

25
Oplus_131072

नझुल पट्ट्यांपासून विमानतळ विस्तारापर्यंत प्रश्नांचा पाठपुरावा; आमदार जोरगेवारांची अपर मुख्य सचिवांशी चर्चा

सुवर्ण भारत :शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर : जिल्ह्याच्या विकासाशी निगडित विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी जनहिताच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या.

यावेळी खाण क्षेत्रातील ओव्हरबर्डन (ओबी) व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित करत ओबी डम्पिंगसाठीची अंतरमर्यादा वाढविण्याची तसेच त्याचा वापर ग्रामीण व शहरी भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी करण्याची मागणी त्यांनी केली. चंद्रपूर व घुग्घुस परिसरातील नझुल जमिनीवरील घरांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचा प्रश्नही त्यांनी मांडला. यामुळे हजारो कुटुंबांना मालकी हक्क मिळून विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले.

कोळसा खाणी, औष्णिक वीज केंद्रे आणि उद्योगांमुळे वाढलेल्या प्रदूषणामुळे प्रभावित नागरिक व शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली. तसेच अतिक्रमित जागांचे नियमितीकरण करून पात्र नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याबाबतही त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.

धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी श्री माता महाकाली मंदिर देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय मोरवा विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करून व्यावसायिक विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. नागपूर महामार्गाला जोडणारा रिंगरोड किंवा बायपास मार्ग तसेच पडोली–विचोडा–छोटा नागपूर–कवठी–भटाडी–पद्मापूर–नेहरूनगर वळण मार्गाला प्रशासकीय मान्यता देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

बैठकीतील विविध विषयांवर अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांकडून आवश्यक अहवाल मागवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.