• चंद्रपुरात शाळा-महाविद्यालयांत मुलींसाठी तक्रारपेटी बसविण्याची मागणी
• भाजप महिला आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन
सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)
चंद्रपूर : शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र तक्रारपेटी बसविण्यात यावी, अशी मागणी भाजप महिला आघाडीने जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जून महिन्यापासून शहरातील सर्व शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत महिलांवरील व मुलींवरील अत्याचार, छेडछाड, विनयभंग, अश्लील हावभाव करणे, अपमानास्पद व लैंगिक स्वरूपाच्या टिप्पण्या करणे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
अनेकदा अशा प्रकारांना सामोरे जाणाऱ्या मुली बदनामीच्या भीतीने किंवा समाज काय म्हणेल या विचाराने शिक्षक, पालक अथवा संबंधित व्यक्तींना घडलेले प्रकार सांगण्यास धजावत नाहीत. त्यामुळे त्यांना सुरक्षित आणि गोपनीय पद्धतीने तक्रार नोंदविता यावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या माध्यमातून शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये तक्रारपेटीची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी भाजप महिला आघाडीने केली आहे.
या तक्रारपेट्या ठराविक कालावधीनंतर नियमितपणे उघडून त्यामधील तक्रारींची गोपनीयतेने दखल घ्यावी तसेच संबंधित मुली व महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे बळ मिळेल, असा विश्वास महिला आघाडीने व्यक्त केला आहे.
यासंदर्भातील निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांना देण्यात आले. यावेळी महानगरपालिका सभागृह नेत्या जयश्री जुमडे, नम्रता आचार्य-ठेमस्कर, नगरसेविका सविता सरकार, महिला शहराध्यक्ष छबु वैरागडे, माजी नगरसेविका चंद्रकला सोयाम, आशा आबोजवार, कल्पना बगुलकर, मोनिशा महातव, सीमा धुर्वे, हिना शेख, समिस्ता शेख, रुपाली आंबटकर आणि ज्योती वेलके उपस्थित होत्या.







