ग्रामीण आरोग्य सेवेसाठी लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनचा उपक्रम
१३ गावांमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर, १७८५ नागरिकांना लाभ, १३४६ जणांना मोफत चष्मे वाटप

घुग्घूस: ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनने मोठे पाऊल उचलले आहे. फाउंडेशनतर्फे परिसरातील १३ गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी महाअभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरांमध्ये १,७८५ नागरिकांची तपासणी करण्यात आली, तर १,३४६ गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाची सुरुवात मुरसा येथून झाली. शिबिराचे उद्घाटन लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुरी यांच्या हस्ते झाले. यावेळी वरिष्ठ महाप्रबंधक डॉ. कौशिक घोष, सहाय्यक महाप्रबंधक डॉ. विध्या पाल आणि शेतकरी प्रशिक्षण केंद्र मुरसाचे व्यवस्थापक डॉ. आदित्य कदम उपस्थित होते. बेलसणीच्या सरपंच सौ. इंदिरा पोले, मुरसाचे उपसरपंच श्री. सुनील मोरे यांच्यासह निवेदिता ठाकरे, किरण बांदूरकर, संध्या पाटील, पुष्पा मालेकर, किशोर वरारकर, विजय आगरे, वैशाली माथने, सुरज तोतडे हे मान्यवरही उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी श्री. प्रशांत पुरी म्हणाले, “ग्रामीण नागरिकांचे आरोग्य सुदृढ असणे हेच खऱ्या विकासाचे लक्षण आहे. आर्थिक अडचण आणि माहितीअभावामुळे अनेकदा डोळ्यांच्या आजारांकडे दुर्लक्ष होते. ही दरी भरून काढण्यासाठीच आम्ही आरोग्य सेवा थेट गावापर्यंत पोहोचवली आहे. व्यवसायासोबतच परिसराचा सामाजिक आणि आरोग्यविषयक विकास करणे ही आमची जबाबदारी आहे. यापुढेही असे उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणात राबवले जातील.”
कोणत्या गावांमध्ये झाले शिबिर
मुरसा, म्हातारदेवी, उसगाव, शेणगाव, पांढरकवडा, वढा, नकोडा, बेलसणी, धानोरा, अंतुर्ला, महाकुर्ला, पिंपरी आणि साखरवाही या १३ गावांमध्ये शिबिरे घेण्यात आली. ग्रामीण भागात नेत्रविकारांबाबत पुरेशी माहिती आणि सुविधा नसल्याने अनेकजण वेळेवर उपचार घेत नाहीत, ही बाब लक्षात घेऊन फाउंडेशनने गावागावांत जाऊन तपासणी केली.
काय झाले शिबिरात
अनुभवी नेत्रतज्ञ आणि वैद्यकीय पथकाने अत्याधुनिक उपकरणांद्वारे तपासणी केली. दृष्टी कमी होणे, चष्म्याचा नंबर वाढणे, डोळ्यांची जळजळ, मोतीबिंदूची प्राथमिक लक्षणे यांचे निदान करण्यात आले. प्रत्येक रुग्णाला आवश्यकतेनुसार मार्गदर्शन देण्यात आले. दृष्टीदोष असलेल्या १,३४६ नागरिकांना जागीच मोफत चष्मे देण्यात आले. गंभीर रुग्णांना पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शनही करण्यात आले.
मान्यवरांनी यावेळी सांगितले की, ग्रामीण भागात वेळेवर आरोग्य सेवा मिळाल्यास अनेक आजार टाळता येऊ शकतात. अशा शिबिरांमुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढते.
या उपक्रमामुळे वृद्ध, महिला आणि तरुणांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी फाउंडेशनच्या या कामाचे कौतुक केले आणि आभार मानले.
लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन यापूर्वीही आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करत आहे. या शिबिराच्या यशासाठी दिपक साळवे, अनुराग मत्ते, श्रीरंग पोतराजे, नीरज काळे, आदित्य मोहितकर, धनंजय पिंपळशेंडे, गजानन बोबडे, अभिजित चौधरी यांच्यासह वैद्यकीय पथक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.






