
• आरपीएफच्या तत्परतेने हरवलेली बॅग अवघ्या काही तासांत परत
• १३९ हेल्पलाईनच्या जलद प्रतिसादाचे प्रवाशाकडून कौतुक
सुवर्ण भारत : शंकर महाकाली
बल्लारपूर : रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि भारतीय रेल्वेच्या १३९ हेल्पलाईनच्या तत्पर व समन्वयपूर्ण कार्यामुळे एका प्रवाशाला ट्रेनमध्ये विसरलेली बॅग अवघ्या काही तासांत सुरक्षितपणे परत मिळाली. आरपीएफच्या दक्षतेमुळे मोठा दिलासा मिळाल्याने संबंधित प्रवाशाने भारतीय रेल्वे, आरपीएफ आणि १३९ हेल्पलाईनच्या कार्याचे मनापासून कौतुक करत सर्वांचे आभार मानले.
मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर येथील पेपर मिलमध्ये कार्यरत असलेले शैलेंद्र आर्य हे १८ जुलै २०२६ रोजी आपल्या कुटुंबासह बल्लारशाह येथून गोंदियाकडे १२७७१ क्रमांकाच्या रायपूर एक्सप्रेसने प्रवास करत होते. दुपारी सुमारे १२ वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावर उतरून घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, त्यांची एक बॅग रेल्वे डब्यातच राहिली आहे.
घटनेची जाणीव होताच त्यांनी तातडीने भारतीय रेल्वेच्या १३९ हेल्पलाईनवर संपर्क साधून हरवलेल्या सामानाची तक्रार नोंदवली. तक्रारीची तत्काळ दखल घेत आरपीएफ आणि हेल्पलाईनच्या पथकाने संबंधित ट्रेनचा मागोवा घेतला. अवघ्या एका तासाच्या आत शैलेंद्र आर्य यांना १३९ हेल्पलाईनवरून फोन करून राजनांदगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या जवानांनी त्यांची बॅग सुरक्षित ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली. तसेच आवश्यक ओळखपत्रासह राजनांदगाव येथील आरपीएफ पोस्टवर येऊन सामान स्वीकारण्यास सांगण्यात आले.
यानुसार रविवारी सकाळी शैलेंद्र आर्य हे राजनांदगाव येथील आरपीएफ पोस्टवर पोहोचले. आवश्यक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांची बॅग सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आली. बॅगेतील सर्व साहित्यही सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
आरपीएफच्या सतर्कतेमुळे आणि १३९ हेल्पलाईनच्या जलद प्रतिसादामुळे हरवलेले सामान अल्पावधीत परत मिळाल्याने शैलेंद्र आर्य यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी आरपीएफचे अधिकारी व कर्मचारी, भारतीय रेल्वे आणि १३९ हेल्पलाईनच्या तत्पर व प्रवासीहिताच्या सेवांचे विशेष कौतुक करत मनःपूर्वक आभार मानले.
— प्रवाशांच्या सुरक्षिततेसह हरवलेले सामान शोधून परत देण्यामध्येही रेल्वे सुरक्षा दलाची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.







