• कारगिल विजय दिवस घुग्घूस येथे उत्साहात साजरा
• माजी सैनिकांचा सन्मान, देशभक्तीच्या घोषणांनी सभागृह दणाणले
घुग्घूस : कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी आणि विजयाच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त घुग्घूस येथील स्नेहप्रभा सभागृहात शनिवार दिनांक 26 जुलै रोजी दुपारी 3:30 वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी झाली. यावेळी कारगिल युद्धात सहभागी झालेल्या तसेच देशसेवा केलेल्या माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या त्याग आणि शौर्याच्या गोष्टींनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.
कार्यक्रमात वक्त्यांनी कारगिल युद्धाचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले. “1999 मध्ये दुर्गम बर्फाच्छादित डोंगरांवर आपल्या जवानांनी दाखवले धैर्य ही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहे. आज आपण शांततेत जगत आहोत ते त्यांच्या बलिदानामुळे,” असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. माजी सैनिकांच्या स्वागतासोबतच सर्व उपस्थितांसाठी नास्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी देशभक्तीपर गीतांवर टाळ्या वाजवून सहभाग नोंदवला.
शेवटी जय हिंदच्या घोषणांसह कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडला.







