Home Breaking News प्रतिबंधित तंबाखू व गुटख्याच्या अवैध विक्रीविरोधात मनसे आक्रमक कल्पना पोतर्लावार यांच्या...

प्रतिबंधित तंबाखू व गुटख्याच्या अवैध विक्रीविरोधात मनसे आक्रमक कल्पना पोतर्लावार यांच्या पुढाकाराने बल्लारशा पोलिसांना निवेदन; अवैध विक्री, साठवणूक व पुरवठ्यावर कठोर कारवाईची मागणी

9

प्रतिबंधित तंबाखू व गुटख्याच्या अवैध विक्रीविरोधात मनसे आक्रमक

कल्पना पोतर्लावार यांच्या पुढाकाराने बल्लारशा पोलिसांना निवेदन; अवैध विक्री, साठवणूक व पुरवठ्यावर कठोर कारवाईची मागणी

सुवर्ण भारत : वैभव मेश्राम
बल्लारपूर, प्रतिनिधी

बल्लारपूर : बल्लारपूर शहर व परिसरात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री, साठवणूक व वितरण होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या तालुका अध्यक्ष कल्पना पोतर्लावार यांच्या पुढाकाराने आज बल्लारशा पोलीस ठाण्यात यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

शहरातील प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या ठिकाणांची तातडीने तपासणी करून संबंधित पदार्थ जप्त करावेत. तसेच हा प्रतिबंधित माल कोठून येतो, त्याचा पुरवठा कोण करतो आणि कोणाच्या माध्यमातून त्याचे वितरण केले जाते, याचा सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता या अवैध व्यवसायामागील साठवणूकदार व मुख्य पुरवठादारांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी भूमिका मनसेने मांडली. दोषी आढळणाऱ्या विक्रेते, साठवणूकदार आणि पुरवठादारांविरुद्ध लागू कायद्यानुसार दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कल्पना पोतर्लावार यांनी केली.

“आपल्या युवकांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. प्रशासनाने तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवून प्रतिबंधित तंबाखू व गुटख्याच्या अवैध विक्रीला आळा घालावा, हीच आमची ठाम मागणी आहे,” असे कल्पना पोतर्लावार यांनी सांगितले.

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी प्रशासनाने सातत्याने कारवाई करण्याची गरज असून, केवळ दिखाऊ कारवाई न करता या अवैध व्यवसायाच्या मुळापर्यंत जाऊन पुरवठा साखळीवर घाव घालावा, अशी मागणीही मनसेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी मनसैनिक संपदा वर्मा, ज्योती बाहुरिया, राणी दसरवार, शकुना बाहुरिया आणि कामाला पुल्लूरवार उपस्थित होते.