Home Breaking News राजीव गांधींच्या दूरदृष्टीतून घडला आधुनिक भारत; युवकांनी राष्ट्रनिर्मितीसाठी पुढे यावे माजी...

राजीव गांधींच्या दूरदृष्टीतून घडला आधुनिक भारत; युवकांनी राष्ट्रनिर्मितीसाठी पुढे यावे माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांचे आवाहन; विदर्भ किसान मजदूर काँग्रेसतर्फे राजीव गांधींना आदरांजली

25

• राजीव गांधींच्या दूरदृष्टीतून घडला आधुनिक भारत; युवकांनी राष्ट्रनिर्मितीसाठी पुढे यावे

• माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांचे आवाहन; विदर्भ किसान मजदूर काँग्रेसतर्फे राजीव गांधींना आदरांजली

सुवर्ण भारत :शंकर महाकाली

चंद्रपूर : भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या ८२व्या जयंतीनिमित्त विदर्भ किसान मजदूर काँग्रेस, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने गांधी चौक येथील कार्यालयात भावपूर्ण आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात युवा नेते राहुलबाबू पुगलिया यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पंडित जवाहरलाल नेहरू आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कृषी, उद्योग, विज्ञान, शिक्षण, संरक्षण तसेच विविध विकास क्षेत्रांत उभारलेल्या भक्कम पायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राजीव गांधी यांनी भारताला नव्या युगाची दिशा दिली. संगणक, दूरसंचार आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाला २१व्या शतकाकडे घेऊन जाण्याची त्यांची दूरदृष्टी आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

देशाची एकता, अखंडता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्ये हीच भारताच्या प्रगतीची खरी पायाभरणी आहे. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट करणे ही आजच्या काळाची गरज आहे. स्व. राजीव गांधी यांच्या विचारांना खरी आदरांजली अर्पण करायची असेल, तर युवकांनी शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी केले.

पंचायतराज व्यवस्थेला बळकटी देण्यापासून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यापर्यंत राजीव गांधी यांनी विकासाची व्यापक दृष्टी देशासमोर ठेवली. त्यांचा हा विकासमार्ग पुढे नेत आधुनिक, सक्षम, प्रगत, धर्मनिरपेक्ष आणि एकसंघ भारत घडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पुगलिया यांनी सांगितले.

यावेळी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेंद्र बेले, चंद्रशेखर पोडे, नगरसेविका वैशाली महाडोळे, रामदास वाग्दरकर, अनिल तुगीडवार, सुधाकरसिंह गौर, अजय महाडोळे, क्रिष्णन नायर, पृथ्वी जंगम, हेमंत आक्केवार, बाबुलाल करूणाकर, बाळू खनके, प्रशांत कस्तुरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.