पैगंबर जयंतीनिमित्त घुग्घुस दुमदुमले; अमराई ते जामा मशीद भव्य मिरवणूक
गांधी चौकात सर्वधर्म समभावाचे दर्शन, देशात शांतता नांदावी म्हणून विशेष दुआ
घुग्घुस, ता. चंद्रपूर :पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीचा सण घुग्घुस येथे मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. यानिमित्त निघालेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
येथील *अमराई वॉर्ड* येथील प्रसिद्ध चांद सावली दर्गा येथून या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मुस्लिम बांधवांच्या वतीने आयोजित या मिरवणुकीत मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इस्लामी झेंडे, आकर्षक पोशाख आणि पैगंबरांच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता.
ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गाने गांधी चौकात पोहोचताच उत्साहाला अधिकच उधाण आले. यावेळी गांधी चौकात उपस्थित असलेल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत सहभागी होत मुस्लिम बांधवांना जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी हिंदू-मुस्लिम एकतेचे आणि सर्व धर्म समभावाचे मनोहर दर्शन घडले.
त्यानंतर ही मिरवणूक शहरातील मुख्य जामा मशीद येथे पोहोचली. येथे मौलवींच्या उपस्थितीत विशेष दुआ पठण करण्यात आले. देशात शांतता, एकता, बंधुत्व आणि सलोखा कायम राहावा यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या प्रार्थनेनंतर मिरवणुकीचा शांततेत समारोप करण्यात आला.








