घुग्घुसच्या शिरपेचात मानाचा तुरा : दै. महासागरचा २०२५-२६ चा वार्षिक पुरस्कार कु. पंकज रामटेके यांना प्रदान
सुवर्ण भारत : शंकर महाकाली
चंद्रपूर / घुग्घुस, दि. ३० ऑगस्ट २०२६, रविवार – दैनिक महासागर परिवारातर्फे दरवर्षी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा यंदा चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सन २०२५-२६ या वर्षासाठीचा हा मानाचा पुरस्कार घुग्घुस तालुका प्रतिनिधी कु. पंकज रामटेके यांना उत्कृष्ट पत्रकारिता आणि व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला.
रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे आयोजित या भव्य सोहळ्यात दैनिक महासागरचे संपादक / प्रकाशक श्रीकृष्ण चांडक, संचालक पंकज चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी उमाशंकर लाल आणि चंद्रपूरचे स्थानिक संपादक प्रवीण बतकी यांच्या हस्ते कु. रामटेके यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याला दैनिक महासागर परिवारातील वरिष्ठ पदाधिकारी, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुके आणि शहरांमधील दैनिक महासागरचे पत्रकार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षी जिल्ह्यातील अनेक पत्रकारांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल वार्षिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कु. पंकज रामटेके यांनी घुग्घुस तालुक्यातील जनतेच्या समस्या, स्थानिक प्रश्न, विकास कामे आणि सर्वसामान्यांच्या अडचणींना सातत्याने वाचा फोडून निर्भीड, निष्पक्ष पत्रकारिता जपली आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन महासागर परिवाराने हा विशेष गौरव केला आहे.
या पुरस्कारामुळे घुग्घुस तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून घुग्घुस तालुक्यातील सर्व स्तरातून, सामाजिक, राजकीय आणि पत्रकार बांधवांकडून कु. पंकज रामटेके यांचे जोरदार अभिनंदन होत आहे.







