Home Breaking News पीपली-बुर्गी प्रकल्पावरून ग्रामस्थ आक्रमक माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्याकडे न्यायासाठी...

पीपली-बुर्गी प्रकल्पावरून ग्रामस्थ आक्रमक माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्याकडे न्यायासाठी धाव; प्रभावित गावांसोबत खुल्या चर्चेची मागणी

10

पीपली-बुर्गी प्रकल्पावरून ग्रामस्थ आक्रमक

माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्याकडे न्यायासाठी धाव; प्रभावित गावांसोबत खुल्या चर्चेची मागणी

सुवर्ण भारत :शंकर महाकाली

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जवेली खुर्द ग्रामपंचायतीअंतर्गत पीपली (बुर्गी) परिसरात प्रस्तावित असलेल्या ओम साई राम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पावरून स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. प्रभावित गावांच्या अटी-शर्ती मान्य करून कंपनीचे अधिकारी, प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात संयुक्त खुली व पारदर्शक चर्चा घडवून आणावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थांनी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. प्रस्तावित प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या गावांतील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन व कंपनीकडे पाठपुरावा करण्याची विनंती यावेळी करण्यात आली.

दरम्यान, ग्रामस्थांनी तहसीलदार, एटापल्ली यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन सादर केले आहे.

कंपनीच्या प्रस्तावासाठी ग्रामसभेचा ठराव मिळविताना काही मोजक्या व्यक्तींमार्फत आर्थिक प्रलोभन देऊन तसेच ग्रामस्थांची दिशाभूल करून ठराव मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. या संपूर्ण प्रक्रियेची प्रशासनाने सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पीपली, बुर्गी, जवेली खुर्द, जिजावंडी, वेलमागड यांसह परिसरातील अनेक गावे प्रस्तावित प्रकल्पामुळे प्रभावित होण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिकांना रोजगाराच्या संधी, पर्यावरणाचे संरक्षण, जमीन व नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.

राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे अधिकारी, प्रशासन आणि प्रभावित गावांतील नागरिकांची संयुक्त खुली बैठक आयोजित करण्यात यावी. या बैठकीत ग्रामस्थांच्या सर्व मागण्या, अटी-शर्ती आणि प्रकल्पाशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून सर्वमान्य तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर राजे अंब्रीशराव आत्राम यांनी स्थानिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. “आपण स्थानिक ग्रामस्थांच्या सोबत आहोत. प्रभावित नागरिकांच्या न्याय्य मागण्या कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू,” असे त्यांनी सांगितले.

या भेटीनंतर पीपली-बुर्गी परिसरातील प्रस्तावित प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या असून, प्रशासन आणि कंपनी ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे.

यावेळी पीपली येथील सचिन लेकामी, पुरुषोत्तम हेडो, दिलीप लेकामी, नानसू हिचामी, पेका लेकामी, मधुकर मट्टामी, संदीप लेकामी, भिवा पदा, रणजित लेकामी, प्रवीण लेकामी; बुर्गी येथील अजित नरोटे, विनोद पदा, अब्बू नरोटे, गणेश नरोटे; जिजावंडी येथील सत्तू तुमरेट्टी, सदाशिव तुमरेट्टी, मंगेश नरोटे; जवेली खुर्द येथील किशोर नरोटे, नागेश गोटा, नरेश दुर्वा, नितेश गोटा आदी ग्रामस्थ उपस्थित होते.