गणेशोत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांचा सत्कार
वरोरा : शांतता आणि सुसंस्कृत संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वरोरा शहरात यंदाचा गणेशोत्सव तसेच गणेश विसर्जन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत पार पडला. गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी वरोरा पोलिसांनी विशेष दक्षता घेत अहोरात्र कर्तव्य बजावले.
गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी वरोरा तालुक्याचे ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
या कार्याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष बाळू गेडाम यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सैनिकांच्या वतीने ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा श्रीफळ, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी संदीप धानोरकर, सतीश प्रेमदास गेडाम, तुलसीदास आलाम, चितमण आत्राम यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी दाखविलेल्या संयम, सतर्कता आणि कर्तव्यनिष्ठेमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. पोलिस प्रशासनाच्या या उल्लेखनीय कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.







