Home Breaking News • महापुरुषांच्या पुतळ्यांची दर महिन्याला स्वच्छता करा! • रोहन कळसकर यांची...

• महापुरुषांच्या पुतळ्यांची दर महिन्याला स्वच्छता करा! • रोहन कळसकर यांची मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

2
Oplus_131072

• महापुरुषांच्या पुतळ्यांची दर महिन्याला स्वच्छता करा!

• रोहन कळसकर यांची मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

सुवर्ण भारत:शंकर महाकाली

बल्लारपूर : शहराची ऐतिहासिक ओळख, सामाजिक अस्मिता आणि नागरिकांसाठी प्रेरणास्थान असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांची नियमित स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी झाशी राणी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रोहन कळसकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी बल्लारपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

बल्लारपूर शहरातील मुख्य नगर परिषद चौकात असलेले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकृती पुतळे, तसेच वस्ती विभागातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा हे नागरिकांच्या श्रद्धेचे आणि प्रेरणेचे केंद्र आहेत. मात्र, शहरातील वाढती वाहनांची वर्दळ, धूळ आणि प्रदूषण यामुळे या पुतळ्यांसह परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. जयंती व पुण्यतिथीच्या निमित्तानेच स्वच्छता केली जाते; मात्र नियमित स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त होत आहे.

महापुरुषांच्या पुतळ्यांचा सन्मान आणि परिसराचे पावित्र्य कायम राखण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी तिन्ही पुतळ्यांची विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मोहिमेत पुतळ्यांची पाण्याने स्वच्छता, चबुतऱ्यांची साफसफाई तसेच परिसरातील कचरा हटविण्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही सुचविण्यात आले आहे.

नगर परिषद प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन पुतळ्यांच्या नियमित स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी व्यवस्था आणि संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा रोहन कळसकर यांनी व्यक्त केली आहे.