• कारवा जंगल सफारीच्या नावाने पर्यटकांची ऑनलाइन फसवणूक; वनविभागाचा सतर्कतेचा इशारा
• सफारीचे बुकिंग केवळ कारवा गेटवरील काउंटरवरच; दलालांच्या आमिषाला बळी पडू नका – वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे यांचे आवाहन
सुवर्ण भारत : शंकर महाकाली
बल्लारपूर : मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर अंतर्गत बल्लारपूर वनपरिक्षेत्रात २०२१ पासून सुरू असलेली कारवा-बल्लारपूर जंगल सफारी अल्पावधीतच पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहे. या सफारीदरम्यान हमखास वाघाचे दर्शन होत असल्याने राज्यासह परराज्यातील आणि परदेशातील पर्यटकही मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत.
मात्र, जंगल सफारीच्या वाढत्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेत काही सायबर भामटे आणि दलाल पर्यटकांना सफारीचे ऑनलाइन बुकिंग करून देण्याचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक करीत असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पर्यटकांनी अशा फसव्या जाहिराती, फोन कॉल आणि ऑनलाइन बुकिंगच्या आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वनविभागाने स्पष्ट केले आहे की, कारवा-बल्लारपूर जंगल सफारीचे बुकिंग करण्यासाठी कोणतीही ऑनलाइन सुविधा उपलब्ध नाही. सफारीचे बुकिंग केवळ कारवा येथील सफारी प्रवेशद्वारावरील अधिकृत काउंटरवर ऑफलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाते.
त्यामुळे पर्यटकांनी अनोळखी व्यक्ती, दलाल किंवा सोशल मीडियावरील बुकिंगच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये. कोणालाही ऑनलाइन पैसे पाठवून फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र दा. घोरुडे यांनी केले आहे.





