प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमध्ये बदल
द रिपब्लिक न्युज नेटवर्क
खामगाव – सध्या संपुर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणुजन्य आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली असून कोरोनाच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत यापूर्वी राज्यातील प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना प्रतिमहा प्रत्येकी ५ किलो मोफत तांदळाचे वितरण करण्यात येत होते. १० जुलै रोजी शासनाच्या पुरवठा विभागामार्फत देण्यात आलेल्या आदेशानुसार आता राज्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना जुलै ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत तांदळासोबत गहू मोफत मिळणार आहे. त्यामध्ये ३ किलो गहू आणि २ किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना गत एप्रिल ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीस ५ किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्पत १० जुलै रोजी देण्यात आलेल्या आदेशानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पात्रा लाभार्थींसाठी जुलै ते सप्टेंबर २०२० या कालावधीत मोफत धान्य वितरीत करण्याकरिता अन्नधान्याचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये राज्यातील प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीला ३ किलो गहू व २ किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शिधापत्रिकाधारकांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत तांदळासोबत आता गहू मोफत मिळणार आहेत.
७ कोटी लाभार्थींना मिळणार मोफत धान्याचा लाभ
राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारक ७ कोटी १६ हजार ३७९ लाभार्थींना प्रत्येकी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ इत्यादी अन्नधान्याचा मोफत लाभ मिळणार आहे. त्यामध्ये प्राधान्य गटातील ५ कोटी ९२ लाख १६ हजार ३१ लाभार्थी आणि अंत्योदय अन्न योजनेतील १ कोटी ८० हजार ३४८ लाभार्थाींचा समावेश आहे.