Home राज्य संवेदनशील, मुख्यमंत्र्यांची असंवेदनशीलकडे वाटचाल..?

संवेदनशील, मुख्यमंत्र्यांची असंवेदनशीलकडे वाटचाल..?

443

थेट कोविड वॉर्डातून….

कोरोना रुग्ण म्हणजे जणू एक समाजातील वेगळी जमात निर्माण होतेय का असं वाटायला लागलंय. खरं तर जेव्हा तुम्हाला कोरोना होतो तेव्हा तुमच्या आजू बाजूला कुणी येत नाही. तुम्हाला कुणी हाथ देखील लावत नाही. तुमच्या कुटुंबाला खूप वेगळ्या नजरेने बघितल्या जाते. एकप्रकारे तुम्ही मानवी मनातून समाजाच्या दृष्टिकोनातुन #बहिष्कृत झालेले असता. अशा वेळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भावनिक आणि सामाजिक साथ मिळाली पाहिजे. याचीच खूप जास्त नितांत गरज रुग्ण व त्याच्या कुटुंबाला असते. अशा वेळी रुग्णांचे मनोबल खूप जास्त खचतांना मी बघितले आहे.

कोरोना झाल्यानंतर जवळचे लोकं, नातेवाईक, मित्र सुद्धा इच्छा असून देखील तुमच्या जवळ येऊ शकत नाहीत. पण ओळख नसलेले हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि त्याच्या सोबत असलेले #स्टाफ_नर्स, #ब्रदर, #वॉर्ड_बॉय हे तुम्हाला हाथ लावतात. औषध देतात. तूमच्या सेवेत 24 तास असतात. पण कधी त्याच्या आपण विचार केलाय का? ते कश्या प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून रोज जगतायत. असंख्य posotive रुग्णांच्या गराड्यात रोज स्वतःला झोकून देऊन दिवसरात्र जागून धावपळ करत असतात. सरकारी दवाखान्यात कमी मनुष्यबळ असताना देखील कमी लोकांना मध्ये आज वाढत असलेल्या रुग्णाना सेवा देण्याचे काम हा स्टाफ करतोय.

#राज्यसरकारने नुकतंच कोविड वार्डात काम करण्यासाठी नव्याने भरती केली आहे. या नवीन परिचारिका जॉईन तर झाल्या आहेत. याच्या 3/3 महिन्यासाठी #ऑर्डर काढण्यात आलेल्या आहेत. 2015 पासून सुद्धा काही स्टाफ नर्स, ब्रदर यांना सुद्धा #कॉन्ट्रॅक्ट_बेसिकवर घेण्यात आलंय. अद्याप पर्यंत यांना कायमस्वरूपी #शासकीय सेवेत समाविष्ट करून घेतल्या गेलेलं नाही आहे. खरं तर सरकारने अशा बाबतीत तात्काळ निर्णय घेऊन यांना संपूर्ण सुविधा देऊन याच्या कायमस्वरूपी ऑर्डर काढायला पाहिजे होत्या.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेली 3 महिने झाले या लोकांना अजून #पगारचं दिल्या गेलेले नाही. कोरोनाच्या काळात नव्याने भरती केलेल्या या परिचारिका वेगवेगळ्या जिल्हयातील तालुक्यातील आहेत. बाहेरगावावरून नोकरी करायला आलेले हे कर्मचारी भाड्याने घर करून स्थानिक सरकारी दवाखान्याच्या हॉस्पिटल जवळ कुठे कुठे राहतायत. मेस लावून जेवण करतात. पण 3 महिने पगार नसल्यामुळे यांना आता मेसचे पैसे, घर भाडे कसं द्यायचं हां मोठा प्रश्न यांच्या समोर उभा आहे. रुग्णांना सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे #मानसिक_स्वास्थ्य जर ठीक नसेल तर ते रुग्णांना कशी काय नीट सेवा देऊ शकतील हा खरा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतंय.

ज्या महिला परिचारिका आहेत त्याचे हाल विचारूच नका. मी स्वतः कोरोना पॉसिटीव्ह असल्यामुळे मला यांचे सर्व हालअपेष्टा जवळून बघत आलोय. पीपीटी किट घालून दिवसभर त्या घामाने परेशान होतात. शरीरातील पाणी कमी होते. बऱ्याच वेळा मी स्वता बघितले या महिला परिचारिका चक्कर येउन खाली पडतात. आणि विशेष म्हणजे यांच्या हार्मोन्स मधे खूप मोठ्या प्रमाणात बदल सुद्धा त्यांना जाणवतं आहेत. असं मला काही डॉक्टरांनी बोलताना सांगितले. आशा विचित्र परिस्तिथी मध्ये हे काम करणारे परिचारिका खरंच आज एका देवदूता पेक्षा कमी नाही. पण सरकारला या गोष्टी व यांचं दुःख कळतं नाही याचं मला आश्चर्य वाटतंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किव्हा आरोयमंत्री राजेश टोपे तुम्ही आणि इतर राज्यसरकारचे मंत्री आमदार खासदार यांना याचं दुःख का दिसतं नाही आहे. आज आशा जीवघेण्या परिस्तिथी मध्ये या आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. यांच्या साधा पगाराचा प्रश्न हे सोडवू शकत नाही. खरंच आपल्या लाज वाटायला पाहिजे आंदोलन करून किव्हा संघर्ष करून जर यांना न्याय देणार असाल तर मग मला असं वाटतंय खरं तर आपली माणुसकी संपली आहे. कारण कोणतेही आंदोलन किव्हा संघर्ष न करता यांच्या समस्या जर सरकारनं सोडवल्या तर तो या परिचरिकांचा खरा सन्मान असेल. पण मुर्दाड सरकारला जनाची नाहींतर मनाची तरी लाज वाटली पाहिजे असं या निमत्ताने ठाकरे सरकारला ठणकावून सांगायची वेळ आता आली आहे.

मुख्यमंत्री साहेब तुम्ही टीव्ही वरून फक्त आवाहन करताय. मोठं मोठ्या गप्पां करता, माझा असा दावा नाही आहे सरकारने काहीच काम नाही केलंय! पण मग लाखो करोडो लोकांचे जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या या मुक्या परिचारिकांचा दबलेला आवाज तुमच्या कानात घुमतांना का दिसत नाही? हीच मोठी शोकांतिका आहे. आज राज्यातील या परिचारिकांचे हे वास्तव कुणी मांडताना दिसत नाही, ना यावर कुणी बोलताना दिसत आहे. जर उद्या यांनी कामावर येणं बंद केलं तर रुग्णांचा कुणी वाली राहणार नाही. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही तात्काळ यांचे पगार आणि त्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी ऑर्डर देऊन त्याचा सन्मान केला तर दुबळी आरोग्य यंत्रणा सक्षम होईल. आणि राज्यातील हजारो लाखो परिचरिकांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील.

आजच्या कोरोनच्या काळात लढणारे खरे सैनिक म्हणजे या परिचारिका आहेत. या योध्याना बळ देण्याऐवजी तुम्ही त्यांना दुर्बळ करून कुपोषित म्हणून वागणूक देत आहात. अजून तरी राज्यातील जनता तुमच्या कडे संवेदनशील मुख्यमंत्री म्ह्णून बघतेय. मुख्यमंत्री साहेब तुमच्या संवेदनशील असलेल्या मनाला एकदा प्रश्न विचारा! या परिचारिका म्हणजे तुमच्या आरोग्य यंत्रणेचे नाक आहे. एकीकडे कोविडमुळे लोक गुदमरून मरतायत, तर दुसरीकडे तुम्ही रुग्णांना सेवा देणाऱ्या या परिचरिकांना जिवंतपणी गुदमरून गुदमरून त्यांच्या श्वासाचा कोंडमारा करताय. ही एकप्रकारे शासकीय हत्या आहे.
या निमित्ताने एकच म्हणावं वाटतंय संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून तुमची ख्याती आहे. पण तुमच्या दुर्लक्षित धोरणामुळे तुमची वाटचाल असंवेदनशील मुख्यमंत्री म्हणून होताना दिसतेय हेच दुर्दैव आहे असंच म्हणावं लागेल.
-राहूल पहूरकर
(लेखक मुबई येथे टिव्ही माध्यमात वरीष्ठ संपादक म्हणून कार्यरत आहेत)