Home Breaking News कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅन संपूर्ण राज्यात लवकरच

कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅन संपूर्ण राज्यात लवकरच

82
मुंबई,  : मुंबईत स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅन चे लोकार्पण होत असले तरी भविष्यात ही सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध  करून  देण्यात येईल असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोविड चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल स्पाईस हेल्थला धन्यवाद दिले. या तीन व्हॅनच्या माध्यमातून मुंबईत दररोज अतिरिक्त ३ हजार कोरोना चाचण्या करता येतील. त्याचा अहवाल २४ तासात मिळेल आणि फक्त ४९९ रुपयांमध्ये कोरोना चाचणी करणे शक्य होईल, अशी माहिती आयुक्त श्री.आय.एस. चहल यांनी यावेळी दिली.

 

एनएबीएल ॲक्रीडेटेड आणि आयसीएमआरची मान्यता असलेल्या स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, स्पाईस जेटचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, संजय जयस्वाल, स्पाईस हेल्थचे जुबेर खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. गोरेगाव, बीकेसी आणि एनआयसी डोम वरळी येथील कोविड केंद्रात या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळा व्हॅनची उपलब्धता करून देण्यात आली आहे.