Home Breaking News जिल्ह्यात मुसळधार…! खामगांव तालुक्यात सर्वात जास्त 55.3 मि.मी पाऊस ; खडकपूर्णाचे ७...

जिल्ह्यात मुसळधार…! खामगांव तालुक्यात सर्वात जास्त 55.3 मि.मी पाऊस ; खडकपूर्णाचे ७ तर मन धरणाचे ३ दरवाजे उघडले!!

149

सरासरी 26 मि.मी पावसाची 
मेहकर तालुक्याने ओलांडली शंभरी
बुलडाणा  : गत दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात दमदार, तर कुठे मध्यम, कुठे तुरळक अशा स्वरूपात वरूण राजा हजेरी लावत आहे. मात्र काल रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पावसाचे धुमशान जिल्ह्यात दिसून येत आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी घुसले आहे. तर काही नागरिकांच्या घरातही पावसाचे पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील वान, पुर्णा, नळगंगा, पैनगंगा, विश्वगंगा, ज्ञानगंगा, खडकपूर्णा आदी नद्यांना पूर आला आहे.
जिल्ह्यात खामगांव तालुक्यात सर्वात जास्त 55.3 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 26 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. तसेच आतापर्यत सर्वसाधारण पर्जन्यमानाशी तुलना केली असता मेहकर तालुक्यात 108.68 टक्के पाऊस झाला आहे. मेहकर तालुक्यने पावसाची शंभरी पार केली असून सिं. राजा तालुका नव्वदीच्या पार आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची. बुलडाणा : 32.7 मि.मी (602.5), चिखली : 30.8 (593.5), दे.राजा : 12.2 (556), सिं. राजा : 16.1 (745.3), लोणार : 23.7 (738.3), मेहकर : 46.2 (911.5.), खामगांव : 55.3 (565.3), शेगांव : 35.8 (376.5), मलकापूर : 19 (432.2), नांदुरा : 20.2 (445.3), मोताळा : 29.7 (461.7), संग्रामपूर : 7.5 (497.4), जळगांव जामोद : 8.3 (351.1)
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 7276.6 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 559.7 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 351.1 मि.मी पावसाची नोंद जळगांव जामोद तालुक्यात झाली आहे. त्याची टक्केवारी 49.66 आहे.
जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ
जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 37.36 दलघमी (53.89), पेनटाकळी : 24.71 दलघमी (41.19), खडकपूर्णा : 78.85 दलघमी (84.45), पलढग : 3.39 दलघमी (45), ज्ञानगंगा : 25.96 दलघमी (76.53), मन : 35.37 दलघमी (96.32), कोराडी : 15.12 दलघमी (100), मस : 8.01 दलघमी (53.26), तोरणा : 4.02 दलघमी (50.95) व उतावळी : 19.79 दलघमी (100).

प्रकल्पांमधून विसर्ग सुरू
जिल्ह्यात काल रात्री व सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे. काही प्रकल्पांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मन प्रकल्पाची जलाशय पाणीपातळी 374.30 मीटर असून जीवंत पाणी साठा 96.32 टक्के आहे. प्रकल्पातून आज दुपारी 4 वाजता 3 दरवाजे 0.10 मीटरने उघडण्यात आले आहे. सद्यस्थितीत नदीपात्रात एकूण 36.00 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यावरून 05 से.मी ने 3.09 क्युसेक विसर्ग सुरू आहे. खडकपूर्णा प्रकल्पातून 2 दरवाजे 20 से.मी उघडल्यामुळे नदीपात्रात 1456 क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मुसळधार पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा
– पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
बुलडाणा  : जिल्ह्यात काल रात्रीपासून अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. तसेच आज 7 सप्टेंबर रोजी सकाळी मुसळधार पावसाची व्याप्ती वाढली. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात व घरात पाणी गेले आहे. परिणामी, त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले. बुलडाणा तालुक्यातील पाडळीसह काही गावे बाधीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. तसेच त्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या.

आ. संजय गायकवाड यांनी केली पाहणी

मोताळा तालुक्यातील विविध भागामध्ये अतिवृष्टिमुळे नदीकाठी वसलेल्या घरांचे आणि शेतीचे अतोनात नुकसान झाले असून त्याची पाहणी बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर  संजुभाऊ गायकवाड़ यांनी केली.

यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच तसेच मोठया संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते, यावेळी अतिवृष्टिने पीड़ित कुटुंबाला तातडीने जीवनावश्यक वस्तुच्या किटचे वाटप करण्यात आले, यावेळी शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

—–

विसर्ग अलर्ट

खड़कपूर्णा प्रकल्प, दे. मही
दि. 07-09-2021
वेळ: 5.00 pm Hrs
जलाशय पाणीपातळी= 520.06 मी.
जीवंत साठा टक्केवारी= 84.45%

आज 07-09-2021 रोजी 5:00 pm वाजता खड़कपूर्णा प्रकल्पाचे 7 द्वार 0.20 मीटरने उघडण्यात आले आहे.
सद्यस्थितीत प्रकल्पाचे 7 द्वार 0.20 मीटरने चालू असून एकूण= 5096.03 क्यूसेक्स(144.2cumec】 विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
– नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे

-खड़कपूर्णा प्रकल्प, पूर नियंत्रण कक्ष
———–

मन प्रकल्प, शिरला
दि. 7-09-2021
वेळ: 16:00pm
जलाशय पाणीपातळी= 374.30. मी.
जीवंत साठा टक्केवारी= 96.32

आज 07-09-2021 रोजी 16.00 pm वाजता मन प्रकल्पाचे 3 द्वार 0.10 मीटरने उघडण्यात आले आहे.सद्यस्थितीत प्रकल्पाचे 3 द्वार 0.10 मीटरने चालू असून एकूण= 36.00m3/से विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

-मन प्रकल्प, पूर नियंत्रण कक्ष