Home Breaking News दगडांना आकार देणारे हात ; करताहेत अक्षरे साकार!

दगडांना आकार देणारे हात ; करताहेत अक्षरे साकार!

94

घरात अठराविश्व दारिद्र्य, त्यामुळे शिक्षण हा भागच नाही. तिसरीत असतानांच घरच्यांनी त्याला हाती छन्नी-हातोडा देवून तळपत्या उन्हात दगडं फोडायला आणलं. अनेक वर्ष त्याने परंपरेनं चालत आलेलं कष्टाचं काम केलं. दगडं फोडू-फोडू त्याचे हात दगडासारखे कठोर बनले होते. तसं त्याला अमिताभ बच्चन यांच्या चित्राचं प्रचंड वेड होतं. परिस्थितीमुळे तो सिनेमे पहायला जात नव्हता, परंतु पोस्टर जावून पाहून यायचा. गावात एकदा कोणीतरी चित्रकार आला, त्याने अमिताभचे काढलेले चित्र जवळून पाहण्यासाठी तो हट्ट धरु लागला. परंतु त्या चित्रकाराने त्याला बाजूला सारले.. जर तो अमिताभचे चित्र काढू शकतो तर आपण का नाही? म्हणून त्याने हाती पेन्सील घेतली व न बघता कल्पनेतला अमिताभ बच्चन काढला. पुढे त्यात रंग भरला व त्यातूनच तो रंगकामाकडे वळला. आज अनेकांची चित्र हुबेहूब काढतो, कितीही उंच मंदीरावर जावून तो दैवी प्रतिमा साकारतो. साक्षात अध्यात्यातले देखावे चित्रातून उभे करतो अन् भारतातल्या कोणत्याही भाषेतील अक्षरांना कागदावर पाहून कल्पक आकार देतो, तो तरुण म्हणजे चिखली तालुक्याच्या धोत्रा भणगोजी या गावातील भगवान गायकवाड.

आजही बरेचसे तरुण आपल्या परिस्थितीला दोष देत, आपल्या पारंपारिक व्यवसायातच गुंतून पडत असल्याची परिस्थिती बNयाचदा पाहायला मिळते… मात्र जिद्द, चिकाटी, आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास आपल्याला आवड असलेल्या क्षेत्रात आपण उत्कृष्टपणे काम करू शकतो, हे दाखवून दिले ते चिखली तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथील भगवान गायकवाड या भटक्या विमुक्त समाजातील तरुणाने. आपल्या पारंपारिक कौटुंबीक प्रथेप्रमाणे तो दगड फोडण्याचे काम करायचा, मात्र त्याला सुरुवातीपासूनच चित्रकला क्षेत्राची मोठी आवड होती. याच क्षेत्रात शिक्षण घेण्याची त्याची इच्छा होती. परंतु परिस्थिती अभावी त्याला तिसरीपर्यंत शिक्षण घेता आले. मात्र हताश न होता या तरुणाने विविध वृत्तपत्रातील अक्षरांचे फॉन्ट समजून घेत, तसे लिहायला सुरुवात केली. त्याचबरोबर चित्रकलेची पदवी घेतलेल्या विद्याथ्र्याप्रमाणे नैसर्गिक, विविध व्यक्तींचे, देवी-देवतांचे तो उत्कृष्टपणे चित्र रेखाटतो. आता या क्षेत्रात तो पूर्णपणे पारंगत झाला असून, त्याने आपला पारंपारिक व्यवसाय बंद केला आहे आणि छन्नी- हातोड्याने दगड फोडणारे हे हात सुबक अक्षर घडवत आहे.

या तरुणाने मुंबई फिल्म इंडस्ट्रीमध्ये पेंटिंग व देखावे असे विविध चित्र रेखाटले आहे. आज रोजी तो पुणे येथे आपल्याला आवड असलेल्या क्षेत्रात काम करतोय. त्याच्याच आधारावर तो आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतो. नुकतीच या तरूणाने बुलडाण्यात आपली एक कला प्रकट केली, बुलडाणा येथील माझ्या परसबागेत. आपल्या कला कौशल्याची अनुभूती त्याने दिली. त्यामुळे शिकण्याची आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास कुठलीच गोष्ट अशक्य नाही, हे या तिसरा वर्ग शिकलेल्या भगवान गायकवाड या तरुणाकडून शिकायला मिळत आहे!

(✍️ राजेंद्र काळे यांच्या फेसबुकवरून साभार)