Home Breaking News विदर्भातील तापमानात किंचित होणार घट

विदर्भातील तापमानात किंचित होणार घट

88

द रिपब्लिक अपडेट न्यूज नेटवर्क

अकोला : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या चोवीस तासांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात बहुतांश भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरातून येणार्‍या वार्‍यांमुळे कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विदर्भातील तापमानात किंचितशी घट होण्याची शक्यता आहे.
राज्यात एप्रिलच्या सुरुवातीपासून सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे आहे. उत्तर-पश्चिम भारतात उष्णतेची लाट असल्याने महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटा आल्या. सध्या विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. मात्र, उत्तरेकडील राज्यांसह दक्षिणेकडेही सध्या पावसाळी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही पावसाची स्थिती आहे. आकाश अंशत: ढगाळ राहणार असल्याने पुढील दोन दिवसांत तापमानात घट होणार आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा तापमानात काही प्रमाणात वाढीची शक्यता आहे
अकोल्यात आज शुक्रवारी वातावरणात अचानक बदल झाल्याने सकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दिवसभरातील कमाल तापमानात २ अंशांची घट दिसून आली. ढगाळ स्थिती असल्याने उन्हाची तीव्रता कमी असली तरी उष्णतेच्या झळा असह्य करणार्‍या होत्या. दिवसभर उकाडा जाणवत होता. विदर्भात बहुतेक जिल्ह्यात एक दोन ठिकाणी पाऊस होऊ शकतो. २३ तारखेला अकोला, भंडारा, नागपूर, वर्धा व वाशीम जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.