Home विदर्भ शेतकरी डॉ. गणेश दातीर यांनी केलं असं काही.. संग्रामपूर तालुक्यात वाहवाही!

शेतकरी डॉ. गणेश दातीर यांनी केलं असं काही.. संग्रामपूर तालुक्यात वाहवाही!

148

संग्रामपूर – तालुक्यातील लाडणापुर येथील शेतकरी तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष व विद्यमान जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ गणेश दातीर यांनी दि.31 मे 22 रोजी संग्रामपूर येथील कांदा व्यापारी इरफानखाँ हबीबखॉ यांना 8 हजार312 रुपयाचा कांदा विकला होता. कांद्याचे पैसे गुगुल पे ने करण्याचे सांगुन ती रक्कम जमा करताना व्यापाऱ्याच्या नजर चुकीने 80 हजार 312 रुपये सायंकाळी 8.30 च्या सुमारास दातीर यांच्या खात्यात जमा झाले. आज 1 जून 22 रोजी सकाळी दातीर यांनी झोपेतून उठता बरोबर 80312 रुपयाचा मॅसेज मोबाईलवर पाहिला असता ते अवाक झाले व त्यांना व्यापाऱ्याची अनावधनाने झालेली चूक लक्षात आली. त्यांनी ताबडतोब सकाळी 6 ते6.15च्या दरम्यान आपले कांद्याचे पैसे काढून शिल्लक जमा झालेले रुपये इरफानखॉ यांच्या खात्यावर जमा करुन तसा निरोपही व्यापारी इरफानखा यांना दिला. दातीर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून इरफानखा यांनी त्यांचे आभार मानले.
यावर्षी सर्वच कांदा उत्पादक शेतकरी बंधू अतिशय कठीण परिस्थितीत जीवन जगताना दिसत आहेत. साधारणपणे एकरी 50 ते 60 हजार रुपये खर्चून किमान उत्पादन खर्च निघेल ह्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी जिवाचा आटापिटा करून पिक काढले परंतु कांद्याचे भाव पडल्याने व बुरशी रोगाची लागण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. परंतु अशाही परिस्थितीत त्यांचा प्रामाणिकपणा कायम असल्याचे दिसून येते. तर व्यापाऱ्यांनी सुध्दा शेतकऱ्यांविषयी आपुलकी ठेवावी अशी प्रतिक्रिया डॉ गणेश दातीर यांनी दिली.