Home Breaking News बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार संपर्कक्षेत्राच्या बाहेर..

बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार संपर्कक्षेत्राच्या बाहेर..

85

देशोन्नती✍️ राजेंद्र काळे यांची पोस्ट

 

संपर्कप्रमुखांच्या संपर्कातही नाहीत रायमुलकर अन गायकवाड

बुलडाणा-
राज्याच्या राजकारणात भूकंप घडविणाऱ्या बातम्या सकाळपासूनच येत असताना, त्यात बुलडाणा जिल्ह्याचाही ‘पॉलिटिकल रिक्टर स्केल’ दणाणून सोडणारा आहे.
कारण शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोबत बुलडाणा जिल्ह्याचे दोन आमदार संजय गायकवाड व संजय रायमुलकर असल्याच्याही बातम्या येत आहेत. विशेष म्हणजे हे दोघंही जण इतके संपर्कक्षेत्राच्या बाहेर आहेत की, त्यांचा जिल्हा संपर्कप्रमुख खा. प्रतापराव जाधव यांच्याशीही संपर्क तुटला असल्याचीही माहिती आहे. दरम्यान आपल्याविषयी काही व्हाट्सअप ग्रुपवर ज्या चर्चा सुरू आहेत, त्या पूर्णतः अफवा पसरविणाऱ्या असून.. आपण जिथे असतो तिथे शंभर टक्के प्रामाणिक असतो, आपल्याकडून आयुष्यातही बेईमानी होऊ शकणार नाही.. अशा भावना मलकापूरचे काँग्रेस आमदार राजेश ऐकडे यांनी व्यक्त करून आपण काँग्रेस विधिमंडळ नेते व प्रदेशाध्यक्ष यांनी ज्याप्रमाणे मतदान करावयाचे सांगितले होते त्याच पसंतिक्रमानुसार मतदान केले असल्याचे ते म्हणाले.

संजय रायमुलकर म्हणा की संजय गायकवाड, हे ना. एकनाथ शिंदे गोटात असलेतरी त्यांचे खरे नेते खा. प्रतापराव जाधव हेच आहेत. मात्र या दोन्ही आमदारांचा 3 दिवसापासून आपल्याशी संपर्कच नसल्याची माहिती प्रतापराव जाधव यांच्याकडून ‘देशोन्नती’ने संपर्क साधल्यावर मिळाली.

खा. प्रतापराव जाधव म्हणाले की, विधान परिषद निवडणूकीमुळे संजय रायमुलकर व संजय गायकवाड हे 3 दिवसापासून मुंबईतच आहे, त्यामुळे त्यांच्याशी 3 दिवसांपासून कसलाही संपर्क झाला नाही. आपल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरचा नातेवाईक वारल्यामुळे काल दिवसभर आपण शेतात ट्रॅक्टरवर काम करत होतो, त्यामुळे थकून गेल्याने रात्री लवकरच झोपलो. सकाळी उठून टीव्ही लावून पाहतोतर बुलडाणा जिल्ह्यातले हे दोन्ही आमदारही गायब असल्याचे कळाले. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे फोन ‘नॉटरिचेबल’ येत असलेली माहिती खा. जाधव यांनी दिली. सध्या ते सुरतला असल्याची माहिती आपल्याला टीव्हीच्या बातम्यावरूनच कळाली. मात्र हे दोन्ही आमदार शिवसेनेशी प्रामाणिक असल्याचा विश्वासही खा. जाधव यांनी व्यक्त केला.

राजेश एकडेंचे मत काँग्रेसलाच
कालच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 3 मते फुटल्याची चर्चा असून, त्यात मलकापूरचे आमदार राजेश ऐकडे यांचे मत नेमके कुणाला मिळाले ? याविषयी चर्चा होत असताना ‘देशोन्नती’ने आ. राजेश ऐकडे यांच्याशी संपर्क साधल्यावर, त्यांनी विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आपल्याला ज्या पसंतीक्रमानुसार मतांचा क्रम दिला होता त्याप्रमाणेच मतदान केल्याचे सांगून.. आपण जिथे असतो तिथे प्रामाणिकच असतो, असे ते म्हणाले.

संजूभाऊनी डीपी बदलेला नाही
दरम्यान आ. संजय गायकवाड यांनी त्यांचा व्हाट्सअपचा डीपी बदलला असून, एकनाथ शिंदे यांचा फोटो डीपी म्हणून ठेवला असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र संजूभाऊंच्या अधिकृत व्हाट्सअप नंबर वर त्यांचाच फोटो डीपीवर ठेवलेला दिसतो.