■ चंद्रपूरात राज्य सरकारी कर्मचारी वर्गांचे आंदोलन-लक्षवेधक ठरलेल्या
■ आंदोलनाचा आजचा ५वा दिवस!
■ दिपक जेऊरकर व राजू धांडे यांनी केले कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन
सुवर्ण भारत: किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)
चंद्रपुर:अंशदायी पेन्शन योजना NPS रद्द करुन सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीच्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने शासनाचे मागणी संदर्भात लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी यांचेकडून सोमवार दि.21/11/2022 पासून दि. 25/11/2022 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील संघटनेच्या कार्यालयासमोर लक्षवेधक आंदोलन करण्यात आले.
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभुमिवर NPS बाबत विचारविनीमय करुन योग्य निर्णय घेण्यासाठी शासनाने सकारात्मक विचार करुन अर्थराज्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली दि. 21/01/2019 रोजी अभ्यास समितीची स्थापना केली. या समितीच्या दोन किंवा तीन बैठका संपन्न झाल्या. परंतु मागील साडेतीन वर्षाचा कालावधी लोटून सुध्दा राज्यातील NPS धोरणा संदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे राज्यातील कर्मचारी शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष आहे. सामाजिक सुरक्षेसाठी नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी परिभाषित पेन्शन योजना सर्वांना लागू करणे हिताचे आहे. अशी सरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची धारणा आहे. अलीकडेच राजस्थान, छत्तीसगड, गोवा, झारखंड या राज्यांनी तेथील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी परीभाषित पेन्शन योजना लागू केली.
महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य असल्याने वरील राज्यांप्रमाणे NPS बाबतचे सुधारीत धोरण महाराष्ट्र राज्यात लागू करावे याकरीता या लक्षवेधी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सदरहु आंदोलनातील उपस्थित कर्मचाऱ्यांना दिपक जेऊरकर व राजु धांडे यांनी आंदोलन कालावधीत NPS हटाव या मागणी संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.
लक्षवेधक ठरलेल्या आंदोलनास सिमा पॉल, प्रशांत कोशटवार, विनोद कोसनकर, श्रीकांत येवले, अतुल साखरकर, संदीप गणफाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. विविध कार्यालयीन संघटनांनी आपला या आंदोलनात सहभाग दर्शविला होता. विशेषता पार पडलेल्या आंदोलनात महिला कर्मचारी वर्गांची उपस्थिती लक्षणीय अशी होती.