Home Breaking News Thane dist@ news • आषाढी एकादशी निमित्त एस.एम.जी.विद्यामंदिराची...

Thane dist@ news • आषाढी एकादशी निमित्त एस.एम.जी.विद्यामंदिराची निघाली उत्साहात बालवारकरी दिंडी ! •अनेकांनी केले दिंडीचे स्वागत !

241

Thane dist@ news

• आषाढी एकादशी निमित्त एस.एम.जी.विद्यामंदिराची निघाली उत्साहात बालवारकरी दिंडी !

•अनेकांनी केले दिंडीचे स्वागत !

सुवर्ण भारत: किरण घाटे(उपसंपादक)

ठाणे:ओम.साई.शिक्षण संस्था संचालित, एस.एम.जी.विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय दातिवली,दिवा(ठाणे) पूर्व शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त काल बालवारकरी”दिंडी”निघाली. या दिंडीत संस्थेचे अध्यक्ष मारूती गायकर, संस्थेचे सचिव स्वप्निल गायकर ,सर्व विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, शाळेचे विद्यार्थी व पालकवर्गांनी आपला सहभाग नोंदविला होता.सकाळी पालखीचे पूजन संस्थेचे सचिव स्वप्निल गायकर व त्यांच्या सुविद्य पत्नी अमिता गायकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारसाची जाण असावी त्याचबरोबर दिंडीतील सर्वांच्या सहभागातून धार्मिक सलोखा व धर्मनिरपेक्षता या संविधानिक तत्वांची व राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण होवून त्यांच्या अंगीभूत असणारी उपक्रमशीलता वाढीस लागावी या हेतूने आषाढी एकादशी निमित्त या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.पालखी सोहळ्याद्वारे समाजाची जवळीक वाढावी व संत परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने दिंडीत शाळेतील बालवारकऱ्यांनी अवघा परिसर ज्ञानमय व भक्तीमय केला. यावेळी पालखीत श्री विठ्ठल रुक्माईची प्रतिमा व ज्ञानेश्वरी ठेवण्यात आली.

पंढरीची वारी ही ईश्वरी प्रेमाची एक विलक्षण अनुभूती आहे. वारी ही साधना असून दिंडी एक साधन आहे. शाळेपासून निघालेल्या दिंडीच्या प्रारंभी भगवी पताका घेऊन नाचणारे वारकरी त्यामागे विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतीक रूपातील विद्यार्थी, नंतर टाळकरी,मृदंग वादक ,विणेकरी व डोक्यावर ग्रंथ तुळशीची रोपे घेऊन आलेले वारकरी, सर्व विद्यार्थी विठू नामाचा जयघोष करीत भक्तगण भक्तिरसात लीन होऊन सहभागी झाले होते. विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी व पालखीचे प्रस्थान विठ्ठल मंदिराकडे झाले.
विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन नंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला. मंदिरात विठू माऊलीचे भजन व आरतीने मंदिराचा परिसर भक्तीमय झाल्याचे चित्र जाणवू लागले होते . दरम्यान मंदिरात विद्यार्थी व शिक्षकांनी फूगडी खेळायचा मनमुराद आनंद घेतला . त्यानंतर दिंडीने शाळेकडे परत प्रस्थान केले. उत्साहात व आनंदात विठ्ठल नामाच्या गजरात हा दिंडी सोहळा संपन्न झाला . दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाच्या नियोजनात संदिप वाघेरे, अरुण गगे, सतिश भारती, संजय शिंगाडे,हरिश्चंद्र घोलप यांचे योगदान मोलाचे ठरले.