Home Breaking News Varora taluka@ news • ई-पीक पाहणी नोंद तातडीने करा वरोराचे तहसिलदार योगेश...

Varora taluka@ news • ई-पीक पाहणी नोंद तातडीने करा वरोराचे तहसिलदार योगेश कौटकर यांचे शेतकरी बांधवांना आवाहन !

98

Varora taluka@ news
• ई-पीक पाहणी नोंद तातडीने करा वरोराचे तहसिलदार योगेश कौटकर यांचे शेतकरी बांधवांना आवाहन !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

वरोरा (चंद्रपूर): ई-पीक पाहणी नोंद नसल्यास अनेक शासन योजनांपासून शेतकऱ्यांना वंचित रहावे लागण्याची शक्यता नुकतीच राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल विभाग) यांनी जारी केलेल्या परिपत्रकात व्यक्त केली आहे. सदरहु पत्रकामध्ये मागील दोन वर्षापासून
राबविण्यात आलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पाचा लेखाजोखा सादर करण्यात आला असुन, सन 2021 मध्ये खरीप पीकांची नोंद टक्केवारी 75.31% तर सन 2022 मध्ये 91.49% असल्याचे सांगण्यात आले.

मागील दोन्ही वर्षांच्या आकडेवारीत सुधारणा दिसत असली तरी काही खातेदार ई-पीक पाहणी अभावी येणाऱ्या काळातील अनेक शासकीय अनुदान व योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता याद्वारे नोंदविण्यात आली आहे.तदवतंच मागील वर्षी खरिप 2022 मध्ये विदर्भातील काही जिल्ह्यात धान पीकाची मुदतीत नोंद न झाल्याने शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत धान पीकाची विक्री करण्याबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्याचे तसेच रब्बी -2022-23 मध्ये कांदा अनुदान योजनेसाठी कांदा पीकाची मुदतीत नोंद न केल्यामुळे देखील शेतक-यांना ब-याच अडचणीस सामोरे जावे लागल्याचे सर्वश्रूतच आहे.

शासनाच्या ई-पीक पाहणी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील पीकांची नोंद स्वतः करण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली असुन शेतकऱ्यांनी मोबाईलमधील गूगल प्ले स्टोअर वरील’ ई-पीक’ या मोबाईल ॲपव्दारे आपली पीकाची माहिती तात्काळ नोंदवावी.

अन्यथा शासकीय स्तरावरून अनुदान किंवा मदत जाहीर झाल्यानंतर आपणास सदरहु मदतीपासून वंचित रहावे लागेल असे वरोरा तहसीलदार योगेश कौटकर यांनी म्हटले आहे.दरम्यान शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी नोंद त्वरित करावी असे आवाहन देखील तहसिलदार कौटकर यांनी केले आहे.

ई-पीक पाहणी प्रकल्पांतर्गत शेतक-यांना ‘ई-पीक’ मोबाईल ॲपव्दारे शेतातील पीक नोंद करण्यात कोणतीही अडचण किंवा समस्या निर्माण होत असल्यास गाव पातळीवरील तलाठी, कृषि सहायक, कोतवाल, युवा पिढी, व विद्यार्थी वर्गांची तात्काळ मदत घ्यावी. अशा प्रकारच्या अडचणी व समस्या उदभवू नये यासाठी तलाठी कृषि सहायक यांना गावातील मोबाईल वापरणारे तरुणांमध्ये अँपचे प्रशिक्षण देण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे तहसीलदार कौटकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना आज सांगितले.