Home Breaking News Chandrapur dist@ news • आ. बंटी भांगडीयांनी मंत्र्यांजवळ मांडली गऱ्हाणी, मंत्र्यांनी...

Chandrapur dist@ news • आ. बंटी भांगडीयांनी मंत्र्यांजवळ मांडली गऱ्हाणी, मंत्र्यांनी केली सोयाबीन पिकाची पाहणी

41

Chandrapur dist@ news
• आ. बंटी भांगडीयांनी मंत्र्यांजवळ मांडली गऱ्हाणी, मंत्र्यांनी केली सोयाबीन पिकाची पाहणी

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चिमुर : तालुक्यातील सोयाबीन पिकावर अचानकपणे विविध रोग आल्यामुळे सोयाबीन पिक काढणीच्या तोंडावरच संपूर्ण सोयाबीनचे पीक पिवळे पडून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक हंगामात हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान या अंतर्गत सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा लागु करा, व तात्काळ सोयाबीन पिकाचे नुकसान भरपाई द्या अशी मागणी एकनाथ थूटे यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांच्या जवळ शेतकऱ्याची कैफियत मांडतांना केली होती.तदवतच आमदार भांगडीया यांनी सर्व कैफियत भाजपाचे नेते एकनाथ थुटे यांच्या कडून ऐकूण घेतली व तात्काळ कृषी विभागाची आढावा बैठक घेऊन सर्वत्र शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे सूतोवाच केले होते. दरम्यान आमदार बंटी भांगडिया यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांची कैफियत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मांडली यावेळी सर्व शेतकऱ्यांची कैफियत ऐकूण महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ चिमूर विधानसभा क्षेत्रात दौरा काढला व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन पिकांची स्वता पाहणी केली.
राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्णजी विखे-पाटील यांच्यासमवेत आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया व गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी नियोजित चिमूर तालुका दौरा कार्यक्रमानुसार तालुक्यातील वहानगांव (बो.), बोथली व रेंगाबोडी गावाला भेट दिली. तसेच नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन, कापूस व इतर पिकांची काल पाहणी केली .व झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला .
सोयाबीन पिकांची पाहणी तालुक्यातील वहाणगाव येथुन करण्यात आली. यात वहाणगाव येथील नत्थुजी रणदिवे, यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी महसूल तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. यानंतर बोथली येथील सुधाकर भरडे यांच्या शेतातील कापूस पिकाचे पूर्णतः नुकसान झाले असल्याने त्यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी केली. रेंगाबोडी येथील गजानन तुकाराम ठोंबरे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी शेतक-यांना नुकसान भरपाई अवश्य मिळेल अशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
त्यानंतर चिमूर पंचायत समिती येथे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. सदरहु बैठकी दरम्यान, जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व तालुक्यातील आढावा सादर केला. यावेळी खासदार अशोक नेते आणि आमदार बंटी भांगडीया यांनी घरकुल धारककरीता ५ ब्रास रेती मोफत असूनही मोफत रेती दिली जात नाही आहे. ती रेती अडविल्या जाते त्यामुळे जिल्हाधिकारी आपण सर्व महसूल विभागातील अधिकारी तहसीलदार, मंडळ अधिकारी,व तलाठी यांना सूचना देऊन आपण ती घरकुल धारकांना रेती मोफत उपलब्ध करून देण्यात यावी. चिमूर तालुक्यात ९० टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले आहे. अश्या सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई देण्यात यावी. असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार बंटी भांगडिया यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना सूचित केले.
आमदार भांगडिया व खासदार अशोक नेते यांनी अनेक विषय या वेळी उचलून धरले .नुकसान भरपाईसाठी दिरंगाई न करण्याचे मंत्र्यांनी निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
या दौरा कार्यक्रमाच्या दरम्यान सर्वप्रथम शेडेगाव व खडसंगी येथे भाजपा कार्यकर्त्यांनी मंत्री महोदय व अन्य मान्यवरांचे पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले. तसेच, वहानगांव (बो.) गाव भेटीदरम्यान भाजपा ओबीसी आघाडी चिमूर तालुकाध्यक्ष एकनाथ थुटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या कुटुंबीयांसमवेत उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. मंत्री महोदयांसमवेत आ. बंटी भांगडिया व खासदार अशोक नेते यांचे आगमनाप्रित्यर्थ उपस्थित होते माता-भगिनींनी औक्षण करत उत्स्फूर्तपणे स्वागत केले व शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ, भगवी टोपी आणि ग्रामगीता भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री महोदयांनी स्थानिक ग्रामस्थांची विविध समस्यां संदर्भात अर्ज निवेदने स्वीकारून त्यांना आश्वस्त केले. दौरा कार्यक्रमा प्रसंगी भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.