Chandrapur dist@news
• महसूल पंधरवडा निमित्त वरोरा महसूल विभागाच्या वतीने पळसगांव सिंगरु येथे शिबीर आयोजित!
• शिबीरात निःशुल्क सातबारांचे वाटप !
वरोरा (चंद्रपूर)किरण घाटे
महसूल पंधरवडा 2024 अंतर्गत ‘महसूल पंधरवडा शुभारंभ व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ प्रचार प्रसिद्धी करणे व योजना लाभार्थी नोंद करणे याकरिता वरोरा तालुका मधील नवीन पळसगांव सिंगरू या आदिवासी पुनर्वसित गावात आज वरोरा महसूल विभागाद्वारे एका भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सदरहू पुनर्वसित गांव 2019 रोजी पुनर्वसित झाल्यापासून डिजिटल सातबारे नसल्या कारणाने इतर योजनांच्या लाभापासून तेथील लोक वंचित होते. मागील वर्षभरापासून जिल्हाधकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात या कामास प्रथम प्राधान्य देऊन डिजिटल सातबारा निर्माण करण्यात आले .
आज एक ऑगस्टला महसूल दिनाच्या निमित्ताने डिजिटल सातबारा निःशुल्क प्रत वाटप करण्यात आले. डिजिटल सातबारा निर्माण झाल्यामुळे आता तेथील शेतकऱ्यांना पीक कर्ज, पिक विमा, पी एम किसान योजना लाभ, शेतावरील सौर कृषी पंप योजना लाभ, एम एस ई बी लाईट कनेक्शन ई योजनांचा ऑनलाईन लाभ घेता येईल.
उपरोक्त गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत सर्व पात्र महिला भगिनींचे नावे नोंद करण्यासाठी बाल विकास अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आदि हजर होते .. सदरहु ठिकाणी गावातील मतदान नोंद नसलेल्या पाच ते सहा महिलांची मतदार नोंदणी करून घेण्यात आली. तसेच इतर निवडणूक विषयक मतदार यादी विषयक समस्या निराकरण करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी , निवडणूक नायब तहसीलदार उपस्थित होते.
या ठिकाणी सेतू केंद्र, पीएम किसान नोंदणी, रेशन कार्ड विभाग यांचे कॅम्प लावण्यात आले होते.
सदरहु कॅम्प करिता वरोराचे उपविभागीय अधिकारी डॉ.शिवनंदा लंगडापुरे तहसीलदार योगेश कौटकर, नायब तहसीलदार उल्हास लोखंडे, निवडणूक नायब तहसीलदार शरद मसराम, मंडळ अधिकारी श्रीरामवार, गावचे पोलीस पाटील,तलाठी अलका धोटे, निवडणूक लिपिक जीवतोडे, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू केंद्र संचालक राकेश इखार उपस्थित होते.
