• गुरुदेव भक्तांचा धडकला तहसिल व पोलिस स्टेशनवर मोर्चा!
सुवर्ण भारत: किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)
ब्रम्हपुरी:गुरुदेव सेवा मंडळाला दान केलेल्या जागेवरील खासदार निधीतून प्रार्थना समाज भवनाच्या कामासाठी निधी प्राप्त झाला . परंतु बाहेर गावातील व्यक्तीने त्या जागेवर आपले अधिकार दाखवून बांधकाम थांबविले.त्यामुळे साहजिकच गुरुदेव भक्तांच्या भावना दुखावल्या !
अर्धवट समाज भवनाचे बांधकाम पूर्ण व्हावे व अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी हळदा येथील गुरुदेव भक्तांनी तहसील कार्यालय व पोलिस स्टेशनवर धडक मोर्चा काढून मागण्यांचे एक लेखी निवेदन स्थानिक तहसीलदार व ब्रम्हपुरी पोलिस निरीक्षक यांना सादर करण्यात आले.
ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथे अनेक वर्षापासून गुरुदेव सेवा मंडळ असून किमान ५० ते ६० गुरुदेव सेवक परिवार आहेत.ते सर्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारसरणीशी प्रेरित होऊन नित्य सकाळ सायंकाळ प्रार्थना करीत असतात.त्याच बरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात.याच कार्याने प्रेरित होऊन गावातील प्रमोद राऊत, सुदाम राऊत यांनी राहणार हळदा यांनी आई वडिलांच्या स्मृती निमित्त ४० बाय ३० एकूण १२०० चौ. मीटर जागा गुरुदेव सेवा मंडळास दान दिली तसे कागद पत्रे देखील उपलब्ध आहेत ती जागा ग्रामपंचायतनी गुरुदेव सेवा मंडळाच्या नावे केली आहे.त्याच जागेवर माजी खासदार यांच्या स्थानिक निधीतून दहा लक्ष रुपयांचा निधी समाज भवना करिता मंजूर झाला व समाज भवनाचे बांधकाम ग्रामपंचायत मार्फत सुरू होते.मात्र सावली तालुक्यातील प्रभाकर पांडुरंग धुडसे या व्यक्तीने बांधकाम विभागास अर्ज सादर करून सदरहु बांधकाम बंद पाडले.बांधकाम विभागाने कोणतीही चौकशी न करता सदरहु बांधकाम बंद करण्याचे पत्र दिले.त्यामुळे गुरुदेव भक्तांच्या भावना दुखावल्या !
बंद पडलेले काम सुरू करावे यासाठी अनेकदा तहसील कार्यालय व बांधकाम विभाग यांना विनंती अर्ज केले .मात्र त्यांनी लक्ष दिले नाही.शेवटी नाईलाजास्तव आज बंद पडलेले काम सुरू करावे या मागणीसाठी रेल्वे फाटक ते तहसील कार्यालय, व पोलीस स्टेशनवर पायी जात गुरुदेव भक्तांनी दिंडी भजन करीत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले. तहसील कार्यालयात निवेदन देऊन दिंडी भजनासह मोर्चा पोलीस स्टेशनवर पोहचला.या वेळी पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.मोर्चात गावातील अनेक पुरुष ,महिला बाल गोपाल गुरुदेव भक्त मोर्चात सहभागी झाले होते.निवेदन देताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.विनोद झोडगे, खोरीप नेते प्रशांत डांगे,सामाजिक कार्यकर्ते रेवणनाथ चिमुरकर सुदाम राऊत,भाग्यवान चिमुरकर,देवराव डोमळे, सचिन बदन, राकेश ठाकरे,महादेव भोयर,रावजी म्हस्के,पांडुरंग राऊत, नामदेव चट्टे,आत्माराम कोवे,रेखा चंदन खेडे,लीना मस्के,मीनाक्षी पेटकर, रितीका कामडी,रुपाली चिमुरकर आदिं गुरुदेवभक्त उपस्थित होते.
