
#Ghugus
• लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनकडून व केंद्रीय कापूस संशोधन केंद्र,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बायोचार प्रात्यक्षिक प्रशिक्षण उत्साहात संपन्न
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
शेणगाव : लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशच्या माध्यमातून शेणगाव येथे नुकतेच बॉयोचार (Biochar)
प्रात्यक्षिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी
आणि कृषी क्षेत्रातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दघाटण लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, घुग्घुसचे युनिट हेड वाय.जी. एस.प्रसाद यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. याप्रसंगी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.ए.माणिकंदन यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित शेतकऱ्यांना बॉयोचारच्या विविध पैलू संबंधी बहुमोल माहिती
दिली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुसचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी, शेणगावच्या सरपंच सौ.पुष्पाताई मालेकर आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुसचे
उपव्यवस्थापक दिपक साळवे यांनी आपली महत्त्वपूर्ण उपस्थिती दर्शविली.
या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात बॉयोचार म्हणजे नेमके काय, त्याचे कृषी क्षेत्रातील अमूल्य महत्त्व,
बायोचार बनवण्याची सोपी प्रक्रिया आणि त्याचे विविध फायदे यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
संस्थेच्या अनुभवी तज्ज्ञांनी उपस्थितांना बायोचार निर्मितीच्या वेगवेगळ्या पद्धती विषयी सविस्तर माहिती
दिली आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले, ज्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान अधिक चांगल्या
प्रकारे समजण्यास मदत झाली.
प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक असलेले वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.ए. माणिकंदन यांनी बॉयोचारच्या वापरामुळे
जमिनीची सुपीकता कशा प्रकारे वाढवता येते, पाण्याची बचत कशी करता येते. आणि रासायनिक खतांचा अनावश्यक वापर कसा टाळता येतो, याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. यासोबतच, बायोचार
जमिनीतील कार्बन शोषून घेण्यास मदत करत असल्याने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी देखील ते किती
महत्त्वाचे आहे,हे त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच कापसाची लागवड व त्याचे संगोपन
याबाबतची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना दिली.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुसचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री.प्रशांत पुरी यांनी यावेळी बोलताना
सांगितले की, "आम्ही नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी योगदान देण्यासाठी तत्पर असतो.
याच भूमिकेतून आज हे शेतकरी प्रशिक्षण आयोजित केले आहे. कमी खर्चात अधिक नफा कसा मिळवता
येईल यासाठी आमची संस्था निश्चितपणे प्रयत्न करेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी
सातत्याने मदत करत राहील,असे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाची सुरुवात उपव्यवस्थापक दीपक साळवे यांच्या प्रास्ताविकाने झाली, तर कार्यक्रमाचे प्रभावी
संचालन अनुराग मत्ते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी समारोपानंतर आभार प्रदर्शन स्नेहा रणदिवे यांनी
केले.
या माहितीपूर्ण प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मुक्त कंठाने कौतुक केले.आणि बॉयोचार निर्मिती तसेच त्याच्या वापराविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता
दर्शविली. लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशच्या वतीने भविष्यातही अशा प्रकारे उपयुक्त आणि ज्ञानवर्धक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील, असे आश्वासन देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे शेणगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख झाली
असून, ते आता आपल्या शेतीत बॉयोचारचा प्रभावीपणे वापर करून अधिक उत्पादन घेऊ शकतील, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद चौधरी,सौ.शीतल कौरासे, श्रीरंग पोतराजे,रमन पानपट्टे, तेजस सोनटक्के आणि लॉयड्स इंफिनाईट फाउंडेशनच्या सर्व
कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.