#Chandrapur
• रक्तपेढी इमारतीचे थाटात भूमिपूजन! संवाद प्रतिष्ठानचा पुढाकार!
सुवर्ण भारत: किरण घाटे(संपादक)
चंद्रपूर:सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संवाद प्रतिष्ठानच्या पुढाकाराने विदर्भातील सर्वात मोठी रक्तपेढी उभारली जाणार आहे. या रक्तपेढीच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन काल रविवारी श्रीमती विमल भूसारी, मीना वासाडे, डॉ. प्रभाताई वासाडे, संवादचे अध्यक्ष चंद्रकांत वासाडे, सचिव विजय बदखल व उपाध्यक्ष डॉ. चेतन खुटेमाटे यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. यावेळी संवाद परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एका वर्षात इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन ही अत्याधुनिक रक्तपेढी गरजूंना सेवा देईल, असा आशावाद वासाडे यांनी व्यक्त केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मागे ४,००० चौरस फुटांच्या जागेत ही रक्तपेढी उभारली जाणार असून, तिला चंद्रभागाबाई नामदेव पाटील वासाडे यांचे नाव देण्यात आले आहे.
ही रक्तपेढी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. रक्तदात्यांकडून घेतलेल्या रक्तातील लाल रक्तपेशी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स वेगळे करण्याची सुविधा येथे उपलब्ध असेल. यामुळे विदर्भातील रुग्णांसाठी ही रक्तपेढी आशेचा किरण ठरणार आहे.
याप्रसंगी संवाद प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी अध्यक्ष वासाडे, सचिव प्रा .विजय बदखल,उपाध्यक्ष डॉ. खुटेमाटे आणि कोषाध्यक्ष दीपक जेऊरकर यांनी मागील वर्षभरातील कामकाजाचा आढावा सादर केला. भूमिपूजन कार्यक्रमाला वासाडे परिवारासह डॉ. अनुप वासाडे, डॉ. सचिन धगडी, डॉ. सुधीर मत्ते, डॉ. धीरज लांबट, डॉ निखिल टोंगे, डॉ भालचंद्र फाल्के, दिनेश कष्टी, शामकांत थेरे, पारस पिंपळकर, महेश खंगार, डॉ. विनोद मुसळे, संतोष थिपे, संजय ढवस, सुधीर ठाकरे, मनोहर पाऊणकर , राहुल बदखल, दीपक ठाकरे, सुधाकर काकड़े, शिरीष कुरेकर, अरविंद मूसळे , अनुप बोर्डे, मनोज ठेंगने, संतोष कुचनकर, आदीं उपस्थित होते.
