वर्ल्ड नो टोबॅको डे निमित्त कोणत्याही कंपनीची जनजागृती नाही!
सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहायक जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर :दिनांक 31 मे हा वर्ल्ड नो टोबॅको डे हा जगभरात साजरा करण्यात येतो मात्र घुग्घूस सारख्या इंडस्ट्रिज एरियात तंबाखूविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन कोणत्याही कारखान्याने व नगर परिषदेने केले नसल्याने नागरिकांत रोष निर्माण होत आहे.
वाढत्या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे समाजात कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः युवक-युवती आकर्षक जाहिरातींना भुलून तंबाखू व तत्सम व्यसनांकडे वळत आहेत, ही बाब चिंताजनक ठरत आहे.तंबाखूचे दुष्परिणाम जनतेपुढे मांडण्यासाठी व समाजामध्ये आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी चळवळ उभी करने आवश्यक असताना घुग्घूस शहरात सर्रासपणे खर्रा, पानमसाला, गुटखा अशा प्रकारची विक्री होत असून याकडे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक दुकानें थाटले असून संपूर्ण भेसळयुक्त तंबाखू वापरून खर्रा बनवून विक्री करीत असल्याची चर्चा आहे.व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असताना नगर परिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे.
समाजाला व्यसनमुक्त आणि निरोगी बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल नगरपरिषदेने उचलून पानठेल्यावर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.
