#Gadchiroli
• तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली
• पोलिसांची शोधमोहिम सुरू
सुवर्ण भारत:रमेश बामनकर
उपजिल्हा प्रतिनिधी,गडचिरोली
अहेरी:- जिल्ह्याच्या सीमेला लागून
असलेल्या तेलंगणाच्या हद्दीतील मेडीगड्डा धरणाजवळ गोदावरी नदीपात्रात अंघोळीसाठी उतरलेली सहा मुले बुडाली. ७जून रोजी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. सहाही मुले तेलंगणाची असून, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.
महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमेवरील मेडिगड्डा धरणाजवळून गोदावरी नदी वाहते. या नदीच्या पलीकडे तेलंगणाच्या हद्दीत मेडीगड्डा धरणाजवळ असलेल्या नदीच्या पात्रात अंघोळीसाठी सहा मुले गेली होती.
पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. तेलंगणा पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, रात्री उशिरापर्यंत मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली आहे. तेलंगणातील वरिष्ठ मंत्री डी. श्रीधर बाबू यांनी या घटनेची माहिती घेतली.
महाराष्ट्र व तेलंगणा सीमेवरील गोदावरी नदीपात्रात शनिवारी सहा मुले बुडाली. यानंतर कुटुंबीय व नातेवाइकांनी असा आक्रोश केला.
बुडालेल्यांमध्ये यांचा समावेश
पत्ती मधुसूदन (वय १५), पत्ती मनोज (१३), कर्नाळा सागर (१४), तोगरी रक्षित (११, चौघे रा. आंबटपल्ली, जि. जयशंकर भुपालपल्ली, तेलंगणा), पांडू (१८) व राहुल (१९, दोघे रा. कोरलाकुंडा, जि. जयशंकर भुपालपल्ली, तेलंगणा) यांचा समावेश आहे.
नदीकाठी काळीज पिळवटणारा आक्रोश
या घटनेनंतर मुलांच्या नातेवाईक व कुटुंबीयांनी गोदावरी नदीकाठी गर्दी केली. महाकाय पात्रात बुडालेली ही मुले सुखरूप परत यावीत यासाठी देवाचा धावा करत काळीज पिळवटणारा आक्रोश केला, त्यामुळे परिसर सुन्न झाला होता.
