Home Breaking News • गोशाळेत साजरा झाला ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ •...

• गोशाळेत साजरा झाला ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ • रोटरी क्लब वरोरा आणि पंचायत समितीचा संयुक्त उपक्रम

63

• गोशाळेत साजरा झाला ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’
• रोटरी क्लब वरोरा आणि पंचायत समितीचा संयुक्त उपक्रम

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा, २२ जुलै २०२५ –
“शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिना”चे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ वरोरा आणि पंचायत समिती वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने घनश्याम लीला गोशाळा, वरोरा येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशी गोवंशाच्या महत्त्वपूर्ण संवर्धनाविषयी जनजागृती करणे आणि गोपालनाचे शास्त्रीय मार्ग सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रमोद बडोले (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन) हे उपस्थित होते.
त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात देशी गायींच्या प्रजननक्षमता, दूधोत्पादन, रोगप्रतिकारक क्षमतेसह शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्थेतील त्यांच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य केले.
त्याचप्रमाणे शासनाच्या राष्ट्रीय गोवंश विकास अभियान, राश्ट्रीय कामधेनु आयोग आणि रोग प्रतिबंधक लसीकरण योजनांबाबत सखोल माहिती दिली.
कार्यक्रमाचे संयोजक आणि प्रास्ताविककर्ते डॉ. राहुल शेंदरे (पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती वरोरा) यांनी सांगितले की,
“देशी गोवंश केवळ शेतीसाठी नव्हे तर जैविक शेती, औषधी गुणधर्म, आणि पर्यावरण साखळीच्या दृष्टीने अमूल्य आहे.
पण अलीकडे त्यांच्या संख्येत घट झाली असून वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे अत्यावश्यक झाले आहे.”
घनश्याम लीला गोशाळेच्या संस्थापक कु. दीप्ती भुतडा व व्यवस्थापक विमल भुतडा यांनी गोशाळेच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा सादर केला.
थारपारकर आणि इतर देशी गायींच्या जतन, संगोपन आणि पुनरुत्पादनावर त्यांचे काम अत्यंत प्रेरणादायी असून, या कार्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष रोटे. योगेश डोंगरवार, सचिव रोटे. राहुल पावडे, तसेच रोटे. अमित लाहोटी, राम लोया, हिरालाल बघेले, चेतन बजाज, अभिजीत बोथले, अभिजीत मणियार, अभिजीत गुंडावार, आणि सीमा लाहोटी यांची उपस्थिती लाभली आणि पशुसंवर्धन विभागाचे डॉ. महेश बिबटे , डॉ. रोहिणी सोनू कुवर, डॉ. नगराळे व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. मनोज जोगी यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले, तर डॉ. माधवी शेंदरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा कार्यक्रम ‘गो दिन’ शासन निर्णयाच्या अनुषंगाने साजरा झाला असून, देशी गोवंशाच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी एक उल्लेखनीय सामाजिक उपक्रम म्हणून गणला गेला.