घुग्घुस पोलिसांच्या सतर्कतेमुळे मनोरुग्ण महिलेला मिळाली मदत
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
घुग्घुस (तालुका चंद्रपूर): २५ जुलै २०२५ शुक्रवार रोजी रात्री घुग्घुस पोलिसांना म्हातारदेवी रोडवर एक मनोरुग्ण महिला फिरत असल्याची माहिती मिळाली. तात्काळ दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला ताब्यात घेतले.
पोलिसांनी या महिलेला तात्काळ सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले. तिच्या मानसिक स्थितीचा विचार करून तिला योग्य वैद्यकीय मदत मिळवून दिली. त्यानंतर, पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि अखेरीस तिच्या कुटुंबीयांना शोधून काढले.
संपूर्ण कार्यवाहीनंतर, पोलिसांनी या महिलेला तिच्या कुटुंबीयांच्या सुरक्षित ताब्यात दिले. घुग्घुसचे मा. ठाणेदार सचिन तायवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस शिपाई अश्विनी मालेकर, पोलीस शिपाई पवन डाखरे, पोलीस शिपाई मंगेश हिवरकर, पोलीस शिपाई कमल राठोड आणि विजय ढपकास यांनी ही संवेदनशील कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे महिलेला वेळेवर मदत मिळाली आणि ती सुखरूप तिच्या घरी परत जाऊ शकली.


