
#Chandrapur
• महसूल सप्ताहात संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना घरपोच सेवा – DBT व DLC साठी
विशेष मोहिम राबविली
सुवर्ण भारत:किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी
महसूल सप्ताह 2025 निमित्त वरोरा तहसील कार्यालयाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष सेवा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे DBT (Direct Benefit Transfer) व DLC (Digital Life Certificate) प्रक्रियेतील अडचणी दूर करत, गरजू नागरिकांना त्वरित सेवा मिळवून देण्यावर भर देण्यात आला.
तहसील स्तरावर लाभार्थ्यांची यादी तयार करून ती गावोगावी जाहीरपणे वाचून दाखवण्यात आली. ग्राम महसूल अधिकारी व कोतवाल यांच्या माध्यमातून ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. अपात्र लाभार्थ्यांची तपासणी तसेच सेवा मिळालेल्या व न मिळालेल्या लाभार्थ्यांची खातरजमा करून यादीतील त्रुटी दूर करण्यात आल्या. यामुळे DBT व DLC प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्यांना तात्काळ सेवा मिळवून देण्याची कार्यवाही केली गेली.
दुर्गम व दूरस्थ भागातील लाभार्थ्यांसाठी विशेष टीम पाठविण्यात आली, तर आजारी व वृद्ध लाभार्थ्यांना घरपोच जाऊन सेवा पुरविण्यात आली. यामध्ये महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी व कोतवाल यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
या उपक्रमामुळे शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात गरजूंना मिळवून देण्यात महसूल विभाग यशस्वी ठरला. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेला बळकटी मिळाली असून, नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
