• रस्त्या दुरुस्त करा विकास दुर्योधन यांचे न.प. मुख्याधिकारी ला दिले निवेदन
सुवर्ण भारत : मनोज मोडक
प्रतिनिधी, चंद्रपूर
भद्रावती : डोलारा प्रभागातील ज्योती झेरॉक्स जवळ, सुरज मेश्राम यांच्या दुकानासमोरील रस्ता गेल्या तीन वर्षांपासून अतिशय खराब अवस्थेत असून, त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा भद्रावती तर्फे नगरपालिकेकडे करण्यात आली आहे. मंगळवारी पक्षाच्या वतीने नगर परिषद भद्रावतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वरोरा-भद्रावती विधानसभा अध्यक्ष विकास दुर्योधन, भद्रावती शहर महासचिव मिलिंद राहुलगडे, शहर सचिव स्वप्नील कोल्हटकर उपस्थित होते. पक्षाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, सदर रस्ता गेल्या तीन वर्षांपासून दुरुस्त न झाल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहनचालक, पादचारी आणि शालेय मुलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघातही घडले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप डागडुजी न झाल्याबद्दल नागरिकांत नाराजी आहे. निवेदनाद्वारे पक्षाने हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
