रस्त्याची दुर्दशा : नागरिक त्रस्त !
टोल कंपनीला दिला आपने विसापूर टोल प्लाजा बंद पाडण्याचा इशारा
सुवर्ण भारत:विशाल डुंबेरे
जिल्हा प्रतिनीधी,चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी-बल्लारपूर-चंद्रपूर-भद्रावती-वरोरा ह्या राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा व धोकादायक परिस्थिती बघता बल्हारपूर आम आदमी पार्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विश्वराज कॉन्ट्रॅक्शन कंपनीला टोल प्लाजा बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेजबाबदार टोल कंपनी विरोधातात ‘आप’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवाज बुलंद केला असून ‘आप’चे शहर अध्यक्ष, रविकुमार पुप्पलवार यांनी या संदर्भात प्रशासनाला एक निवेदन सादर केले आहे. या महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तरीही प्रशासन आणि टोल कंपनी कोणतीही ठोस कार्यवाही करीत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विश्वराज कॉन्ट्रॅक्शन कंपनीने २०४१ पर्यंत या रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी घेतली आहे. मात्र, चांगल्या रस्त्याऐवजी खड्डेमय मार्ग ते देत असतानाही कंपनी लोकांकडून नित्य टोल वसूल करत आहे. ही निव्वळ जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
“या “महत्त्वाच्या व प्रमुख महामार्गाची दुरावस्था!
———————————————-
रस्त्यावर जागोजागी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. भरलेली गिट्टी रस्त्यावर पसरलेली आहे. यामुळे दुचाकीस्वार व अन्य वाहनांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) ३० हून अधिक नोटीसा पाठवूनही टोल कंपनीने यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. यामुळे प्रशासकीय नियंत्रणाचा अभाव स्पष्ट दिसतो.
रवि पुप्पलवार यांनी थेट आरोप केला आहे की, टोल कंपनीला काही मोठ्या राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्यामुळे ते जनतेच्या जीवाशी
खेळत आहेत. लोकांच्या भावनांची पर्वा करत नाहीत. निवेदन देण्यासाठी ‘आप’ने दोन
दिवसांपूर्वीच लेखी सूचना दिली होती, तरीही टोल कंपनीचे
अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. उलट, पोलिसांचा मोठा ताफा बोलावून ‘आप’च्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. विश्वराज कॉन्ट्रॅक्शन कंपनीला येत्या ५ दिवसांत रस्त्यावरील खड्डे आणि पसरलेली गिट्टी साफ करून रस्ता दुरुस्त केला नाही तर विसापूर टोल प्लाझा बंद पाडण्याचा इशारा पुप्पलवार यांनी दिला आहे.
निवेदन देतेवेळी शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार, उपाध्यक्ष अफजल अली, सचिव ज्योती बाबरे, संघठन मंत्री रोहित जंगमवार, सह संघठन मंत्री सलमा सिद्दिकी, प्रवक्ता आसिफ शेख, शिक्षण आघाडी अध्यक्ष अजयपाल सूर्यवंशी, युथ अध्यक्ष सागर कांबळे, युथ उपाध्यक्ष स्नेहा गौर, महिला उपाध्यक्षा मनिषा अकोले, सरमन बंसल, सुशील वासेकर, हर्षद खंडागड़े व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
‘आप’चा हा लढा जनतेच्या सुरक्षिततेसाठी असून, जोपर्यंत रस्त्याची स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत पदाधिकारी शांत बसणार नाही, असे आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर समितीने ठामपण सांगितले आहे.

