• चंद्रपूर जिल्ह्यात महसूल फेरफार प्रकरणात लोक अदालत
• सिंदेवाहीच्या भूमी अभिलेख कार्यालयात येत्या १८ सप्टेंबरला फेरफार लोक अदालतचे आयोजन
चंद्रपूर – किरण घाटे
चंद्रपूर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखचे प्रदीप जगताप यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील
चंद्रपूर/भद्रावती/वरोरा/चिमूर / ब्रम्हपूरी /नागभीड/सिंदेवाही
मुल/सावली/पोंभूर्णा /गोंडपिंपरी /बल्लारपूर/राजूरा/ कोरपना /जिवतीचे उपअधीक्षक भूमि अभिलेख यांना महसुली फेरफार प्रकरणांत लोक अदालत आयोजित करणेबाबतचे नुकतेच पत्र दिले आहे.
नागपूरचे उपसंचालक भूमि अभिलेख, प्रदेश,नागपूर यांच्या दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजीच्या सभेतील सुचनेनुसार महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रलंबित फेरफार प्रकरणांसंबंधाने लोक अदालत आयोजित करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.
महसूल मंत्री बावनकुळे हे दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात विविध विभागांची आढावा सभा घेणार आहेत.त्यामुळे महसूल फेरफार प्रकरणांच्या या विषया संबंधाने आढावा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व उप अधिक्षक भूमी अभिलेख यांनी बुधवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ पूर्वी आपले स्तरावरील प्रलंबित सर्व फेरफार प्रकरणा संबंधाने फेरफार अदालत घ्यावी असे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख चंद्रपूर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व उप अधीक्षक भूमी अभिलेख यांना पत्राद्वारे सूचित केले आहे.
त्याअनुषंगाने उप अधीक्षक भूमी अभिलेख सिंदेवाहीचे सुधीर लव्हाळे यांनी गुरुवार दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी फेरफार प्रकरणांच्या संदर्भात लोक अदालतीचे उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय सिंदेवाही येथे सकाळी ११.०० वाजता आयोजन केले आहे.फेरफार प्रकरणे लोक अदालती मध्ये निकाली काढली जाणार असल्यामुळे जनतेनी या लोक अदालतचा फायदा घ्यावा असे आवाहन सिंदेवाहीचे उप अधीक्षक भूमी अभिलेख सुधीर लव्हाळे यांनी केले आहे.

