टँकरची स्कुटीला जोरदार धडक – एक ठार, एक जखमी
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा : राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरील शेगाव पोलीस स्टेशनजवळ आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात स्कुटीवर मागे बसलेल्या महिलेला जीव गमवावा लागला. या अपघातात मुलगा जखमी झाला असून उपचार सुरू आहेत.
मृत महिला कोमल गंगाधर कातोरे (वय ३३, रा. गांधी वॉर्ड, वरोरा) यांचा जागीच मृत्यू झाला. स्कुटीवर त्यांचे पती गंगाधर बापूराव कातोरे (वय ४२) व मुलगा रोहन कातोरे (वय १३) हे देखील होते. हे तिघेही भिवापूर तालुक्यातील सेलोटी येथे तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघाले असताना सकाळच्या सुमारास पेट्रोल टँकर (क्र. MH 34 AB 4509) ने त्यांची स्कुटी (क्र. MH 34 CP 1649) ला मागून जोरदार धडक दिली.
या धडकेत कोमल कातोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा रोहन जखमी झाला असून त्याच्यावर वरोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच शेगाव बु. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ पंचनामा करत टँकरचा चालक परमेश्वर खामदेवे (रा. पडोली) याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुमित कांबळे आणि त्यांच्या पथकाद्वारे सुरू आहे.
दरम्यान, अपघातस्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
‘सर्विस रोड असता, तर अपघात टळला असता’ – नागरिकांची प्रतिक्रिया
शेगाव ते वरोरा, चिमूर, उमरेड मार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई हा मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा रस्ता आहे. या रस्त्यालगत १२ मीटर रुंदीचा सर्विस रोड नकाशात असताना तो प्रत्यक्षात बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यावरच दुकानदारांचे अतिक्रमण व वाहनांची अनधिकृत पार्किंग वाढली आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि वारंवार अपघात घडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
“जर नियोजित सर्विस रोड बांधण्यात आला असता, तर असा अपघात टळू शकला असता,” असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.
🕯️ श्रद्धांजली:
कोमल कातोरे यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे वरोरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

