Home Breaking News दारू दुकानांसमोर सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कारवाईची मागणी : शहर काँग्रेसकडून पोलिसांना निवेदन

दारू दुकानांसमोर सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कारवाईची मागणी : शहर काँग्रेसकडून पोलिसांना निवेदन

92

दारू दुकानांसमोर सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कारवाईची मागणी : शहर काँग्रेसकडून पोलिसांना निवेदन

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : शहरातील दारू दुकानांसमोर खुलेआम दारू पिणे, भांडणे, सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे यांसारखे गैरप्रकार वाढत चालले असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारांवर तात्काळ कारवाई करून शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालावा, अशी मागणी बल्लारपूर शहर काँग्रेस समितीच्या अल्पसंख्याक विभागाने पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील विविध भागांतील दारू दुकानांसमोर रस्त्यावरच दारू पिण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. या ठिकाणी वाहने उभी केली जात असून, त्यामुळे महिलांना व नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी या ठिकाणी झालेल्या वादविवादांतून मारहाणीच्या घटना घडत असून, चोरीसारखे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा ठिकाणी नियमित गस्त वाढवावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच शहरातील मुख्य महामार्गावरील शाळांपुढे अवैधरित्या उभे राहणारे ट्रक हे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करत आहेत. या ट्रकांमुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारवाई करून या ट्रकांना हटवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

हे निवेदन शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष ताहिर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी शहर काँग्रेसचे सचिव दौलत बुंदेल, सोशल मीडिया प्रमुख शेख कासिम, व्यापारी मंडळाचे हरीश चुक, सरचिटणीस सय्यद अजीज, उपाध्यक्ष बशीर खान, तसेच किशोर नागराळे, अमजद खान, साई, संजय बोमले, नजीर सय्यद, ताहिर शेख, श्रीनिवास निजानप, मोनू शेख, अंकित मोरे, संजय उपटलवार यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिस प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी शहर काँग्रेसने जोरदारपणे लावून धरली आहे.