• शासकीय वाटप जमीनींच्या फेरफार प्रकरणात सखोल चौकशी होवून दोषींवर कठोर कारवाई व्हावी!
समाजसेवक बालाजी बावणेंची मागणी !
• जिल्हास्तरीय पथक नेमून तलाठी दप्तर तपासणी करावी अनेक प्रकरणे उजेडात येण्याची शक्यता?
• एव्हढे वर्ष होवूनही या प्रकरणाकडे अधिका-यांचे लक्ष नाही?
चंद्रपूर- किरण घाटे –
चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल महसूल उपविभागीय अंतर्गत येणाऱ्या सावली तालुक्यातील साखरी या गावात काही भूमिहीन शेतकऱ्यांना शासकीय जमीनीचे वाटप करण्यात आले होते.परंतु काही मंडळींनी त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत त्या जमिनींची वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता सर्रासपणे
विक्रीपत्र,बक्षीसपत्र,व संमतीपत्र केल्याची बाब उघडकीस आली आहे.
ह्यात त्या वेळचे दुय्यम निबंधक मंडळ अधिकारी व पटवारी दोषी असल्याचे समाजसेवक बालाजी बावणे यांचे म्हणणे आहे.
उपरोक्त प्रकरणात सखोल व निःपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी बावणे यांनी केली आहे.
या साठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष पूरवून चौकशी साठी जिल्हास्तरीय पथक नेमावे असे देखील बावणे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे.
या व्यतिरिक्त असे अनेक प्रकरणे या तालुक्यात उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी वरिष्ठांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
विशेष म्हणजे त्यांनी जे काही फेरफार प्रकरणे तक्रार अर्जात दर्शविले आहे .
त्यांचे फेरफार होवून सातबाराच्या नावात दुरुस्ती झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
एव्हढे वर्ष होवूनही हे सर्व प्रकरणे तलाठी दप्तर तपासणीत उजेडात का आले नाही हे एक कोडेच आहे.
संबंधित तलाठी दप्तरची सखोल तपासणी केल्यानंतर अजून काही प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे बावणे यांचे म्हणणे आहे.

